शुबमन गिलची ८७ धावांची खेळी, श्रेयस अय्यरची वादळी आणि महत्त्वपूर्ण फटकेबाजी, संकटमोचक अक्षर पटेलचं अर्धशतक अन् भारताच्या गोलंदाजांची भेदक गोलंदाजी यासह भारतीय संघाने इंग्लंड संघावर पहिल्या वनडेत ४ विकेट्सने सहज विजय मिळवला आहे.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेला इंग्लंड २४८ धावा करत ४७.४ षटकांत सर्वबाद झाला. तर भारताने ३८.४ षटकांत इंग्लंडवर ४ विकेट्सने विजय नोंदवला.
२४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पदार्पणवीर यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार रोहित शर्माने सुरूवात केली. पण आर्चर आणि साकिब महमूद यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीसमोर फारश्या धावा दोघांना करता आल्या नाहीत आणि दोघेही झेलबाद होत माघारी परतले. कर्णधार रोहितने (२) पुन्हा एकदा निराशा केले. कसोटी फॉर्मेटमध्ये त्याचा खराब फॉर्म वनडेमध्येही कायम राहिला.
श्रेयस अय्यरचं ‘वादळी’ पुनरागमन
रोहित बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या श्रेयस अय्यरने आक्रमक सुरूवात केली आणि भारतीय संघात पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केलं. श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल यांनी दमदार खेळी करत विजयाचा पाया रचला. विशेषतः, अय्यरने येताच आक्रमक फलंदाजी केली आणि आर्चरच्या षटकात २ षटकार आणि १ चौकारा लगावत आपले मनसुबे जाहीर केले. अय्यरने अवघ्या ३० चेंडूत अर्धशतक झळकावले पण त्याला आपल्या डावाचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करता आले नाही. श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर अक्षरला बढती मिळाली आणि त्याने गिलबरोबर १०८ धावांची भागीदारी केली, ज्यामुळे विजय निश्चित झाला. अर्धशतक झळकावल्यानंतर अक्षर आदिल रशीदच्या गोलंदाजीवर बाद झाला, तर शुबमन गिल त्याच्या शतकापूर्वी ८७ धावांवर बाद झाला. यानंतर हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजाने संघाला विजयापर्यंत नेले.
तत्पूर्वी, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. बेन डकेट आणि फिल सॉल्ट या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी करून इंग्लिश संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर सॉल्टच्या (४३) रूपात इंग्लंडला पहिला धक्का बसला. तो धावबाद झाला. त्यानंतर इंग्लंडने डकेट (३२) आणि हॅरी ब्रुक (०) यांच्या विकेट लवकर गमावल्या. बऱ्याच काळानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये परतलेला जो रूट १९ धावा करून बाद झाला. इंग्लंडने १११ धावांवर चौथी विकेट गमावली.
विकेट्सच्या पडझडीत बटलरचे अर्धशतक
एका बाजूला सतत विकेट पडण्याच्या काळात, कर्णधार बटलरने ६७ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. त्याने त्याच्या अर्धशतकी खेळीत ४ चौकारही मारले. दरम्यान, बटलरने जेकब बेथेलसोबत ५९ धावांची उपयुक्त भागीदारी केली. बटलरचे हे वनडे कारकिर्दीतील २७ वे तर भारताविरुद्धचे चौथे अर्धशतक ठरले. त्याची विकेट अक्षर पटेलने घेतली.
बेथेलचे अर्धशतक
इंग्लंडने १११ धावांवर चौथी विकेट गमावली तेव्हा बेथेल मैदानात आला. या युवा डावखुऱ्या फलंदाजाने भारतीय गोलंदाजांना धाडसीपणे तोंड दिले आणि केवळ ६२ चेंडूत त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. प्रभावी फलंदाजी करणारा बेथेल ६४ चेंडूत ५१ धावा करून बाद झाला. अनुभवी फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने एक विकेट घेतली. अक्षर पटेलने ७ षटके गोलंदाजी केली आणि ३८ धावा देत एक विकेट मिळवली. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने एक विकेट घेतली. जडेजाने शानदार गोलंदाजी केली आणि विरोधी फलंदाजांना अडचणीत आणले. त्याने २६ धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या. हर्षित राणानेही पदार्पणाच्या सामन्यात ३ विकेट्स घेतल्या.