राज्यातील सर्वात मोठा ड्रग्जचा पर्दाफाश; दक्षिण अफ्रिकेच्या दोघांना अटक
बंगळूर : कर्नाटकच्या इतिहासातील सर्वात मोठ्या ड्रग्ज विरोधी कारवाईत, शहरात ७५ कोटी रुपये किमतीचे ३७.८७ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
निश्चित माहितीच्या आधारे, मंगळुर सीसीबी पोलिसांनी गेल्या पाच महिन्यांपासून बंगळुरमध्ये कारवाई हाती घेतली आणि परदेशी नागरिकांना अटक केली.
दिल्लीतील एका प्रयोगशाळेत दररोज एमडीएमए ड्रग्ज तयार केली जात होती. आठवड्यातून एकदा, पार्सल विमानाने बंगळुरला येत असे. बंगळुरमध्ये दर आठवड्याला १५-३० किलो आणि महिन्याला किमान १०० किलो एमडीएमए अंमली पदार्थ येत असत. पोलिस तपासात असे दिसून आले आहे की बंगळुरमध्ये दरमहा किमान ५०-६० कोटी रुपयांची अमली पदार्थांची तस्करी होते. दिल्ली विमानतळाचे अधिकारी आणि बंगळुर विमानतळाचे अधिकारी यांनी ड्रग्ज माफियांना पाठिंबा दिल्याचे आरोप होत आहेत.
या कारवाईबद्दल बोलताना मंगळुरचे पोलिस आयुक्त अनुपम अग्रवाल म्हणाले, “कर्नाटकच्या इतिहासातील ही सर्वात मोठी ड्रग्ज कारवाई आहे. ७५ कोटी रुपये किमतीचे ३७.८७ किलो ड्रग्ज आम्ही जप्त केले आहेत. दक्षिण आफ्रिकेचे नागरिक असलेले बंबा फॅन्टा आणि अबीगेल अॅडोनिस या दोघांना अटक केली आहे.
आम्ही सहा महिन्यांपूर्वी हैदर अली नावाच्या व्यक्तीला अटक केली. आम्ही त्याच्याकडून १५ ग्रॅम एमडीएमए जप्त केले आणि चौकशी सुरू केली. सीसीबी पोलिसांनी चौकशीदरम्यान एका नायजेरियन नागरिकाची माहिती मिळवली. आम्ही बंगळुरमध्ये एक कारवाई केली आणि पीटर नावाच्या व्यक्तीला ६ कोटी रुपयांच्या एमडीएमएसह अटक केली. या प्रकरणानंतर, आम्ही तपास केला आणि मुख्य सूत्रधार शोधण्यासाठी मोहीम सुरू केली.
गेल्या ६ महिन्यांपासून त्याच्या स्रोताचा शोध घेण्यासाठी एक मोहीम सुरू आहे. परदेशी नागरिक ड्रग्जची वाहतूक करत असल्याची माहिती होती. त्यांनी सांगितले की, १४ मार्च रोजी दिल्लीहून बंगळुरला जाणाऱ्या विमानात परदेशी महिला ड्रग्ज आणत असल्याची माहिती मिळाली.
बंगळुरमधील इलेक्ट्रॉनिक सिटीमधील निलाद्री नगरमध्ये दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. ट्रॉली ट्रॅव्हल बॅगमध्ये एमडीएमए ड्रग्ज होते. ७५ कोटी रुपये किमतीचे एमडीएमए ड्रग्ज जप्त करण्यात आले. याशिवाय चार मोबाईल फोन, एक पासपोर्ट आणि १८ हजार रोख रक्कम जप्त करण्यात आली.
हे आरोपी बंगळुर आणि इतरत्र नायजेरियन विक्रेत्यांकडे ड्रग्जची वाहतूक करत होते. त्यांनी बनावट पासपोर्ट आणि बनावट व्हिसाचा वापर करून प्रवास केला. या प्रकरणाची पुढील चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.