29 ला हजर राहण्याची सूचना
बंगळूर : केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात आले आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्याच्या सुळ्ये न्यायालयाने वॉरंट जारी करून 29 सप्टेंबरला न्यायालयासमोर हजर राहण्यासाठी डीजी व आयजीपीनाही नोटीस जारी करण्यात आली आहे.
सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ऊर्जा मंत्री असताना डी. के. शिवकुमार यांना वीज समस्येसंदर्भात सुळ्ये तालुक्यातील बेळ्ळारीसाई गिरीधर यांनी दूरध्वनीवरून फोन केला होता. यावेळी दोघांमध्ये वादावादी झाली होती.
त्यानंतर डी. के. शिवकुमार यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. शिवकुमार यांच्या तक्रारीच्या आधारे गिरीधर यांना पोलिसांनी अटक केली. शिवकुमार यांना या प्रकरणाच्या संदर्भात साक्ष देण्यासाठी यायचे होते. पण त्यांना अनेक नोटिसा बजावण्यात आल्यानंतरही ते हजर न झाल्याने वॉरंट जारी करण्यात आले आहे.
बळ्ळारी व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष गिरीधर राय यांनी 28 फेब्रुवारी 2016 च्या रात्री तत्कालीन मंत्री डी. के. शिवकुमार यांना फोन केला होता. दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यामुळे संतप्त झालेल्या शिवकुमार यांनी गिरीधरविरोधात मेस्कॉम एमडी तत्कालीन सुळ्यचे प्रभारी एईई हरीश नायक यांच्यामार्फत तक्रार दाखल केली. या प्रकरणी गिरीधर रायला बळ्ळारी पोलिसांनी अटक केली होती.
