Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगावमध्ये परंपरेनुसार रविवार दि. १९ रोजी शिवजयंती, मंगळवारी २१ ला चित्ररथ मिरवणूक

Spread the love

 

बेळगाव : बेळगावमध्ये वैशाख शुद्ध द्वितीयेला म्हणजेच अक्षय तृतीयेच्या आदले दिवशी पारंपरिक पद्धतीने छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली जाते, तसेच तिसऱ्या दिवशी भव्यदिव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाते.

यावर्षीही रविवार दि. १९ एप्रिल रोजी शिवजयंती साजरी होणार असून मंगळवार दि. २१ रोजी बेळगाव शहरातून भव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे.
गेल्या आठवड्यात जत्तीमठ येथे मध्यवर्ती श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे रविवार दि. १९ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजल्यापासून विविध गडकिल्ल्यावरून आणण्यात येणाऱ्या शिवज्योतीचे स्वागत धर्मवीर संभाजी चौक येथे मध्यवर्तीच्या वतीने करण्यात येणार आहे.
त्यानंतर सकाळी ठीक ९.०० वाजता नरगुंदकर भावे चौकातील मध्यवर्ती श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या मंडपात शिवरायांच्या मूर्तीचे विधिवत पूजन- आरती करण्यात येईल.
मध्यवर्तीच्या वतीने सकाळी १०.०० वाजता छत्रपती शिवाजी उद्यान शहापूर येथील शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार घालून वंदन करण्यात येईल.

मंगळवार दि. २१ रोजी सायंकाळी ठीक ६.०० वाजता नरगुंदकर भावे चौकात मान्यवरांच्या हस्ते पालखीचे पूजन करून अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला सुरुवात होणार असून त्यानंतर पालखी आणि चित्ररथ मिरवणूक मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, समादेवी गल्ली, डॉ राजेंद्रप्रसाद चौक, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी महाराज चौक, किर्लोस्कर रोड, जत्तीमठ मार्गे सम्राट अशोक चौक, रामलिंग खिंड गल्ली, टिळक चौक, मुजावर गल्ली, पाटील गल्ली, कपिलेश्वर उड्डाणपूल मार्गे कपिलेश्वर मंदिर येथे मिरवणुकीची सांगता होणार आहे.

मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या माध्यमातून यावर्षी १०७ वी शिवजयंती साजरी केली जाणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांना सर्व शिवभक्त आणि नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्यवाह मदन बामणे, शिवराज पाटील आणि सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *