
शब्दगंध कवी मंडळात काव्यरसिकांची मेजवानी

बेळगाव : शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “कवी समजून घेताना” या उपक्रमात कवी परशराम खेमणे यांनी “जगण्याचे पान” या शीर्षकाखाली आपले सहावे पुष्प गुंफत काव्यप्रेमींना समृद्ध अनुभव दिला. या कार्यक्रमात त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये, शैली आणि जीवनदृष्टी यांचा वेध घेत कवी म्हणून त्यांना विविध अंगांनी समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
प्रास्ताविक व स्वागत करताना शब्दगंध कवी मंडळाचे अध्यक्ष प्रा. अशोक आलगोंडी यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती देत कवी आणि रसिक यांच्यातील नात्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यानंतर कवी परशराम खेमणे यांनी आपल्या काव्यप्रवासाविषयी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कविता ही केवळ शब्दांची मांडणी नसून ती स्वतःशी साधलेला आत्मसंवाद आहे. कॉलेज जीवनापासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास सुरुवातीला छंद म्हणून होता; मात्र शब्दगंध कवी मंडळाच्या सहवासात त्याला दिशा मिळाली.
“कविता म्हणजे भावनांचे चित्र डोळ्यासमोर उभे करणे आणि शब्दांशी खेळ करत अंतर्मन व्यक्त करणे होय,” असे सांगताना त्यांनी कवितेचा उगम अनुभव, वाचन आणि जगण्यातील सूक्ष्म जाणिवांमधून होत असल्याचे स्पष्ट केले. “प्रत्येकाच्या मनात कविता दडलेली असते; मात्र ती व्यक्त करण्याचे कौशल्य महत्त्वाचे आहे,” असेही ते म्हणाले.
त्यांच्या सादरीकरणातील कवितांमधून सामाजिक वास्तव, बदलते जीवनमान आणि मानवी संवेदनांचा सूक्ष्म वेध दिसून आला. त्यांच्या एका कवितेतील ओळी—
“मनाचे ओझे घेतात कागद,
शब्दांना हाका देतात कागद;
सुगंध जात नाही घामाचा तो,
चांदण्यास साद देतात कागद.”
—या ओळींमधून कवीने कागद आणि शब्द यांचे भावविश्व जिवंत केले. तर पावसावरील कवितेतून शहर आणि ग्रामीण जीवनातील विरोधाभास अधोरेखित करताना ते म्हणतात—
“शहरातील लोकांना नकोच असतो पाऊस,
पण पाऊस खुळाच असतो,
नको तिथे पडतो, पाहिजे तिथे पडत नाही.”
यातून आधुनिक जीवनातील कृत्रिमता आणि निसर्गाशी असलेले तुटलेले नाते उलगडते. तसेच बदलत्या गावजीवनावर भाष्य करताना त्यांच्या ओळी—
“हरेक जण मोबाईलमध्ये डोके खुपसून बसलेला,
आपल्या मधील संवाद हरपला नजरेदेखत…”
—या आजच्या वास्तवाचे बोलके चित्र रेखाटतात. एकूणच, “जगण्याचे पान” या कार्यक्रमातून काव्य हे जीवनाशी जोडलेले माध्यम असल्याची जाणीव अधिक दृढ झाली. कवी परशराम खेमणे यांच्या विचारांमधून कविता ही केवळ अभिव्यक्ती नसून ती समाजमनाचा आरसा असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
पहिल्या सत्रात आयोजित कवी संमेलनात विविध कवींनी आपल्या कवितांद्वारे कार्यक्रमात रंग भरला. स्मिता किल्लेकर, नेहा जोशी, अस्मिता आळतेकर, सीमा कणबरकर, स्नेहल बर्डे, डॉ. प्रेमा मेणशी, शितल पाटील, चंद्रशेखर गायकवाड, जोतिबा नागवडेकर, महादेव खोत, गुरुनाथ किरमटे, सुधाकर गावडे, बसवंत शहापूरकर, कृष्णा पारवाडकर, प्रा. निलेश शिंदे आणि प्रा. अशोक आलगोंडी या कवींच्या कवितांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
शब्दगंध कवी मंडळ संघाचे उपाध्यक्ष बसवंत शहापूरकर यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta