Sunday , June 21 2026
Breaking News

मराठी भाषिकांचा उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार; मराठी भाषिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

Spread the love

 

बेळगाव : २२ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या महामोर्चाला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने नवा मार्ग स्वीकारत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने एकत्र जमून कन्नड सक्तीविरोधातील निवेदन सादर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मराठा मंदिर येथे रविवारी झालेल्या समितीच्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे होते. त्यांनी प्रास्ताविकातून सद्य परिस्थितीची माहिती देत मराठी भाषिकांच्या प्रश्नांवर सविस्तर भूमिका मांडली. रणजित चव्हाण पाटील यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट करत मराठी जनतेने एकजुटीचे दर्शन घडविण्याची गरज अधोरेखित केली.

बैठकीत उद्या, सोमवार दि. २२ जून रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हजारोंच्या संख्येने मराठी भाषिकांनी उपस्थित राहून आपल्या मागण्यांचा आवाज बुलंद करण्याचे आवाहन करण्यात आले. “महामोर्चा निघणार नाही, पण मराठी जनतेचा निर्धार मोडणार नाही,” असा ठाम संदेश देत समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभूतपूर्व उपस्थिती नोंदविण्याचे आवाहन केले.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्वतः उपस्थित राहून मराठी भाषिकांचे निवेदन स्वीकारावे, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात प्रशासनाकडे सादर केलेल्या मागण्यांचा पुनरुच्चार करत समितीने विशेषतः ४० टक्के भाषा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून सर्व शासकीय फलकांवर मराठी भाषेला न्याय मिळावा, ही प्रमुख मागणी पुन्हा अधोरेखित केली.

माजी आमदार मनोहर किणेकर यांनी प्रशासनाला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देताना सांगितले की, मंत्री एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मराठी भाषिकांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही ठोस अंमलबजावणी झालेली नसल्याने मराठी जनतेत तीव्र नाराजी आहे. त्यामुळे आपल्या हक्कांसाठी मराठी समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकजूट दाखविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

मराठी अस्मिता, भाषा हक्क आणि सीमाभागातील जनतेच्या न्याय्य मागण्यांसाठीचा संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करत समितीने २२ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर ऐतिहासिक उपस्थिती लावण्याचे आवाहन केले आहे.

बैठकीत पियुष हवळ, अनिल पाटील, मनोहर हुंदरे, बी. डी. मोहनगेकर, ॲड. अमर येळ्ळूरकर, शिवाजी खांडेकर, ॲड. एम. जी. पाटील, राजाराम देसाई, डी. बी. पाटील, आर. एम. चौगुले, आबासाहेब दळवी, जयराम देसाई, मुरलीधर पाटील, नारायण सांगावकर, रामचंद्र मोदगेकर, मारुती परमेकर, नेताजी जाधव, आर. के. पाटील, गोपाळ देसाई, रणजित चव्हाण पाटील, मालोजी अष्टेकर आणि लक्ष्मण होनगेकर यांनी आपली मते व्यक्त केली. यावेळी अरुण नावलकर, राजू मरवे यांच्यासह मध्यवर्ती समितीचे अनेक सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

2 कोटींच्या विमा रकमेच्या हव्यासातून पतीची हत्या; मुलीच्या कृत्याने व्यथित आईची आत्महत्या

Spread the love  हुक्केरी : 2 कोटींच्या जीवनविमा रकमेच्या लालसेपोटी माजी सैनिक संदीप मंजरगी यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *