Monday , June 22 2026
Breaking News

स्वत:च्या अपंगत्वालाच बलस्थानी ठेऊन परशराम गुरव बनले बस्तवाडच्या पंचक्रोशीतील पहिला वकील!

Spread the love

 

खानापूर : बस्तवाड तालुका खानापूर येथील प्रशांत उर्फ परशराम हे क्लास टू शासकीय अधिकारी नोकरीत राहून अभ्यासाची कास घट्ट धरून रत्नागिरी येथील कायदा महाविद्यालच्या नुकताच जाहीर झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या कायदा परीक्षेत उत्तम गुणवतेसह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून बस्तवाड, करजगी, मेरडा, हलगा, किरहलशी, जांभेगाळी, देवराई या पंचक्रोशीतील पहिले वकील बनले त्यांचीच ही प्रेरणादायी व्यथेची कथा एकदा डोळ्याखालून सर्वांनी घालावी म्हणून हा शब्द प्रपंच!
काही माणसांचा जन्म सुखसोयींसाठी होत नाही. त्यांचा जन्म संघर्षाला अर्थ देण्यासाठी आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवण्यासाठी झालेला असतो. परशराम उर्फ प्रशांत गुरव हे असेच एक नाव आहे.
खानापूर तालुक्यातील बस्तवाड. डोंगर-दऱ्या, जंगल आणि निसर्गाच्या कुशीत विसावलेलं एक दुर्गम गाव. आज मुरम मातीचे का असेनात रस्ते आहेत, पण बस सुविधा नाही, पण काही दशकांपूर्वी इथे पोहोचण्यासाठी पायवाटेवरूनच प्रवास करावा लागायचा. अशा गावात श्री. लक्ष्मण गुरव आणि सौ. भागिरथी गुरव यांच्या घरी एका मुलाचा जन्म झाला.
नियतीने जन्मताच त्याची परीक्षा घ्यायचे ठरवले होते. लहान वयातच डाव्या पायाला पोलिओ झाला. एका आईच्या कुशीतलं लेकरू आणि एका बापाच्या खांद्यावरचं स्वप्न अचानक अपंगत्वाच्या ओझ्याखाली दबून गेलं.
दिवसागणिक मोठा होणारा मुलगा आणि त्याचं वाढत जाणारं अपंगत्व पाहून आई…वडिलांच्या छातीत काळजीचा धगधगता निखारा पेटत असे.
वडील लक्ष्मण गुरव हे मोठे अधिकारी नव्हते. मोठे जमीनदार नव्हते. ते ट्रकवर हमाल म्हणून काम करायचे. कधी डोक्यावर पोती, कधी खांद्यावर लाकडाचे ओझे, कधी मोठी पहार घेऊन बलाढ्य नाटा (बुंधे) परतवून “दम लगा के ऐसा म्हणत” लाकूड वाहू ट्रकमध्ये चढवायचे तर कधी दिवसभर कष्ट आणि संध्याकाळी थकलेलं शरीर घेऊन निवांत झोपायचे पण त्या कष्टकरी हातांत प्रचंड ताकद होती आणि आहे!
ते उत्कृष्ट नेमबाज होते. त्यांनी धरलेला नेम सहसा चुकत नसे. जंगलातील हिंस्त्र जनावरे पाहून लोक घाबरायचे, ती जनावरे मात्र लक्ष्मण गुरवांच्या धाडसाला घाबरून सळो की पळो करत असत.स्वतः अंगठेबहाद्दर असले तरी मुलांच्या शिक्षणाबाबत ते कधीच कमी पडले नाहीत.
आई भागिरथी गुरव तर या संघर्षकथेची खरी नायिका आहे. स्वतःच्या सुख-दुःखाचा विचार न करता लेकरांच्या भविष्याचा विचार करणारी ती माय होती. घरात कितीही अभाव असला तरी तिच्या मायेची उब आणि संस्कारांची श्रीमंती कधी कमी झाली नाही.
“फांदी तुटो वा पारंबी” म्हणत त्यांनी आपले संस्कार तुटू दिले नाहीत, उलट हा त्या माऊलीचा जगण्याचा मंत्र बनला…..
एक दिवस खानापूर तालुक्याचे बुलंद नेतृत्व, नामवंत पैलवान आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते कल्लाप्पा मष्णू पाटील यांनी लक्ष्मण गुरवांना सांगितले,
“लक्ष्मण, तुझ्या या मुलाला वकील कर!”
कारण बुद्धिचं आणि विळ्याच्या धारेचं काम सारखं आहे घासत राहिलं की ती वाढत जाते,
लहानगा परशराम ते शब्द ऐकत होता.
योगायोग असा की नंतर एक दिवस पुन्हा बस्तवाडच्या पुलावर आणखी एक प्रसंग घडला. समितीचे निष्ठावंत पदाधिकारी आणि नामवंत लाकूड ठेकेदार कै. एन. एस. प्रभू यांनी गाडी थांबवून लक्ष्मण गुरवांना हाक मारली आणि म्हणाले,
‘लक्ष्या, तुझ्या या सोट्ट्या परशाला वकील कर बे!” त्यांची ही भाषा त्याकाळी आदरार्थी माणून स्वीकारली जात होती,
त्या दोन वाक्यांनी मात्र अपंग प्रशांत/परशरामच्या मनात स्वप्नांचा अंकुर प्रचंड ताकदीने रुजला होता
खरं तर स्वप्न पाहणं सोपं असतं; ते जगणं कठीण असतं हे माहीत होतं….म्हणूनच
परशरामचा संघर्ष सुरू झाला.
कधी हॉटेलमध्ये काम, कधी मेडिकल स्टोअरमध्ये नोकरी,कधी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून जंगल भटकंती, कधी विटा मारण्याचे मजुरीचे काम, कधी शिक्षक, कधी प्राध्यापक.
जीवनाने दिलेली प्रत्येक भूमिका त्यांनी स्वीकारली; पण एक भूमिका मात्र मनातून कधी पुसली गेली नाही…. वकील होण्याची.
दरम्यान शिक्षणाची वाट सुरूच राहिली. बी.ए., एम.ए. (हिंदी),एम.एस.डब्ल्यू., संगणक डिप्लोमा, मराठी आणि इंग्रजी टायपिंग अशी एकामागोमाग एक शैक्षणिक शिखरे त्यांनी सर केली.
सगळं काही असूनही प्रयत्न करण्याआधी काहीजण हार मानतात; पण एका पोलिओग्रस्त युवकाने स्वतःच्या मर्यादांनाच पायरी बनवून यशाच्या दिशेने चढाई केली. आज ते महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात जबाबदार शासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या यशामागे आणखी एक व्यक्ती खंबीरपणे उभी आहे…,त्यांची पत्नी सौ प्राची.
‘प्राची’ म्हणजे उगवती दिशा. सूर्योदय ज्या दिशेने होतो ती दिशा. अंधार संपवून प्रकाश देणारी दिशा. परशराम यांच्या आयुष्यातील प्राचीही तशीच ठरली. संघर्षाच्या वाटेवर चालताना तिने केवळ संसाराची जबाबदारी सांभाळली नाही; तर त्यांच्या स्वप्नांवरचा विश्वासही जपला. अनेकदा माणूस स्वतःच्या क्षमतेवर शंका घेतो; पण त्याच्यावर विश्वास ठेवणारी व्यक्ती त्याला पुन्हा उभं करते. परशराम यांच्या आयुष्यात ती भूमिका प्राची यांनी लीलया निभावली.
त्यांच्या जीवनात आता चिरंजीव पार्थ आहे.महाभारतातील अर्जुनाचा पराक्रमी पुत्र जसा पार्थ म्हणून ओळखला जातो, तसाच हा पार्थ आपल्या वडिलांच्या संघर्षाचा, जिद्दीचा आणि मूल्यांचा वारसा घेऊन वाढत आहे. आजोबांच्या कष्टांचा, आजीच्या संस्कारांचा, आईच्या त्यागाचा आणि वडिलांच्या परिश्रमांचा हा जिवंत वारसदार आहे. त्यांचे बंधू संतोष गुरव यांनीही संघर्षाची वेगळी वाट चालली. गवंडी म्हणून सुरुवात करून आज बांधकाम व्यवसायात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. एका भावाने पुस्तकांच्या वीटा रचल्या, तर दुसऱ्याने सिमेंटच्या वीटा रचत कुटुंबाचा संसार उभा केला. परशराम गुरव यांची कथा ही केवळ एका व्यक्तीची यशोगाथा नाही.
ती एका हमाल बापाच्या घामाची कथा आहे.
ती एका आईच्या ओल्या पदराची कथा आहे.
ती भावाच्या त्यागाची कथा आहे.
ती पत्नीच्या विश्वासाची कथा आहे.
ती मुलाच्या भविष्यासाठी लढणाऱ्या बापाची कथा आहे……
आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे……
“ती अपंगतवावर मात करणाऱ्या माणसाच्या जिद्दीची कथा आहे”
आज जे लोक नशिबाला दोष देतात, परिस्थिती समोर रडतात, गावाला दोष देतात, गरिबी समोर गळा काढतात, त्यांनी एकदा परशराम गुरव यांच्या जीवनाकडे पाहावे.
कारण अपंगत्व असूनही जो माणूस चालत राहिला…गरिबी असूनही जो शिकत राहिला…उपेक्षा असूनही जो हसत राहिला…आणि संघर्ष असूनही जो स्वप्न पाहत राहिला…
तो आज शासकीय अधिकारीही आहे आणि वकीलही आहे.
म्हणून परिस्थितीला दोष देणाऱ्यांच्या गालावर ही कहाणी एक सणसणीत चपराक आहे….
नियतीने परशराम यांच्या एका पायात शक्ती कमी दिली असेल; पण त्याच्या बदल्यात त्यांच्या मनात हिमालयाएवढी ताकद दिली आहे.
आज त्यांच्या वडिलांचे कष्ट, आईचे अश्रू, पत्नीचा विश्वास आणि स्वतःची अथक मेहनत या सर्वांचा विजय झाला आहे.
आकाशात झेपावणाऱ्या गरुडाला पाहून लोक अचंबित होऊन त्याचे पंख पाहतात; पण त्या झेपेमागील जखमा कुणालाच दिसत नाहीत.
परशराम गुरव यांच्या यशाची उंची सर्वांना दिसते आहे; पण त्या उंचीपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी चाललेला काट्यांचा रस्ता फक्त त्यांनाच माहीत आहे.
आणि म्हणूनच…
परशराम गुरव हे नाव एखाद्या व्यक्तीचे नाही; ते जिद्दीचे दुसरे नाव आहे!
अभिनंदन गड्या तु तर मोबाईलच्या विळख्यात अडकलेल्या प्रतीभावंताना शरमेने लाजवलास!
💐💐💐👑💐💐💐

परशराम यांचे पुढील ध्येय परिस्थितीने अर्धवट ठेवलेली एम फील आणि पी एच डी आहे
नक्कीच ते यात ही यशस्वी होतील यात तिळमात्र शंका नाही…..शुभं भवतू💐👍
शब्दांकन :::::::::::::::::::::::::
अरविंद पाटील
प्राचार्य
म मं ताराराणी पदवीपूर्व महाविद्याल खानापूर

About Belgaum Varta

Check Also

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर खानापूर प्रशासन सतर्क; आपत्ती निवारण पूर्वतयारी बैठकीत अधिकाऱ्यांना कडक इशारा

Spread the love  खानापूर : मान्सून काळात उद्भवू शकणाऱ्या पूर व इतर नैसर्गिक आपत्तींचा सामना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *