Tuesday , May 12 2026
Breaking News

एपीएमसी पोलिसांची घरफोडी प्रकरणी तिघांना अटक; ४.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

 

बेळगाव : एपीएमसी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घरफोडी प्रकरणाचा यशस्वी छडा लावत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल ४ लाख ७१ हजार ७४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये रोख रक्कम, सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच दुचाकी वाहनांचा समावेश आहे. देवेंद्र उर्फ डेब्या रमेश वाघमोरे (वय ३९), सचिन दत्तात्रय गवळी (वय ३९) आणि कपिल उर्फ आप्पा बजरंग जाधव (वय २३) अशी अटक केलेल्यांची नावे असून तिघेही कोल्हापूर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ मे २०२६ रोजी एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुवेंपु नगर येथे राहणारे अरुण जाधव हे घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटे फोडून रोख रक्कम तसेच सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेण्यात आले. घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर जाधव यांनी एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने संशयितांचा शोध घेण्यात आला.

तपासादरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी घरफोडीची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्या ताब्यातून १ लाख ६७ हजार १८६ रुपये रोख रक्कम, १२.०८० ग्रॅम सोन्याचे दागिने, १ लाख ८३ हजार ८८८ रुपये किमतीचे ७४४.५ ग्रॅम चांदीचे दागिने तसेच १ लाख २० हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी असा एकूण ४ लाख ७१ हजार ७४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई एपीएमसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली असून आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

मराठी भाषा प्रेरणा मंचच्यावतीने दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार सन्मान

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथील मराठी भाषा प्रेरणा मंचच्यावतीने नुकताच निकाल जाहिर झालेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *