Monday , September 21 2026
Breaking News

फटाका दुर्घटनेतील युवकाला मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत

Spread the love

 

बेळगाव : “रुग्ण सेवा हीच ईश्वरसेवा” या भावनेतून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपत फटाका दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या युवकाला मदतीचा हात दिला आहे.

शहापूर नवी गल्ली येथील शिवा नारायण लोहार हा युवक मागील महिन्यात भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाचा आनंद साजरा करताना फटाके वाजवित असताना झालेल्या दुर्घटनेत गंभीर जखमी झाला होता. या अपघातात त्याच्या दोन्ही डोळ्यांना गंभीर इजा झाली होती. गेल्या महिनाभरापासून त्याच्यावर बेळगाव येथील केएलई हॉस्पिटलमध्ये विविध शस्त्रक्रिया आणि उपचार सुरू होते.

उपचारादरम्यान त्याचा एक डोळा पूर्णतः निकामी झाल्याचे समोर आले असून दुसऱ्या डोळ्यासाठी पुढील मोठ्या उपचारांची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान, केएलई हॉस्पिटलमधील उपचारासाठी लागणारा संपूर्ण खर्च मुख्यमंत्री सहायता निधी (CMRF) योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला असून त्यामुळे रुग्णाच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

आज, दिनांक 13 मे रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीचे वैद्यकीय समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकर यांनी प्रत्यक्ष केएलई हॉस्पिटलला भेट देऊन आवश्यक शासकीय कागदपत्रांची पूर्तता केली तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून रुग्णाला डिस्चार्ज मिळवून दिला. पुढील उपचारांसाठी देखील आवश्यक ती मदत व पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

या प्रकरणात महाराष्ट्र एकीकरण समिती शहापूर विभागाचे अनिल आंबरोळे आणि पवन धामणेकर यांनीही विशेष पुढाकार घेत रुग्णाला मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.

विशेष म्हणजे, मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळण्यासाठी संबंधित अर्जावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी आवश्यक असते. त्यासाठी प्राचार्य आनंद आपटेकर आणि अनिल आंबरोळे यांनी मुंबई येथे जाऊन स्वतः पाठपुरावा करत आवश्यक मंजुरी मिळवून दिली होती.

मुंबई दौऱ्यादरम्यान सीमाभागातील अनेक रुग्णांचे अर्ज तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून सर्व अर्जांना मंजुरी मिळवून देण्यात आली. या आठवड्यात संबंधित सर्व रुग्णांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *