
हिंदू धर्मामध्ये विवाह संस्थेला अत्यंत पवित्र आणि विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी विवाह हा पंधरावा संस्कार मानला जातो. विवाह म्हणजे केवळ व्यक्तींचे नव्हे, तर दोन कुटुंबांचे आणि दोन आत्म्याचे मिलन होय. हा केवळ शारीरिक संबंध नसून मानसिक, सामाजिक आणि अध्यात्मिक बंध मानला जातो. गृहस्थाश्रम, धर्म, काम आणि मोक्ष याकडे नेणारा हा संस्कार असल्याने हिंदू विवाह पद्धतीला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
विवाह विधींमध्ये गणेश पूजन, कन्यादान, लाजाहोम आणि सप्तपदी सारख्या विधींना विशेष महत्त्व असते. अग्निदेव, पुरोहित आणि समाजाच्या साक्षीने दोन व्यक्ती विवाह बंधनात अडकतात त्यामुळे विवाह सोहळ्याला पवित्र स्थान प्राप्त झाले आहे. काळानुसार विवाह पद्धतीत अनेक बदल झाले.
पूर्वी वधूच्या घरासमोर साधेपणाने विवाह सोहळे पार पडत असत. परंतु बदलत्या काळानुसार विवाह सोहळे शहरातील धार्मिक स्थळे, मंगल कार्यालय किंवा भव्य सभागृहांमध्ये थाटामाटात होऊ लागले आणि विवाह समारंभाचे स्वरूप बदलले. या विवाह सोहळ्याचे पवित्र नाममात्र राहिले असून आता इव्हेंट मॅनेजमेंट आणि मार्केटिंग यामध्ये विवाह सोहळा गुरफटून गेला आहे.
काही वर्षांपूर्वी पर्यंत लग्नातील पारंपारिक पंगतीची जागा बुफे पद्धतीने घेतली. तेवढ्यापुरता हा बदल स्वीकारार्ह वाटत असला तरी सध्या बेळगाव शहरासह परिसरात हिंदू विवाह पद्धतीला काही प्रमाणात हिडीस आणि विकृत स्वरूप प्राप्त होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः मराठा समाजात विवाह संस्कारांच्या पावित्र्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत अनेकांकडून व्यक्त केली जात आहे.
आज-काल लग्न ठरल्यानंतर धार्मिक विधींपूर्वी “प्री-वेडिंग फोटोशूट” हा जणू विवाह सोहळ्याचा अविभाज्य भाग बनला आहे. या फोटोशूटवर लाखो रुपये खर्च केले जात असून वधू-वरांच्या खाजगी क्षणांचे सार्वजनिक प्रदर्शन केले जात आहे. त्याचबरोबर गुजराती आणि मारवाडी समाजाचे अनुकरण करून संगीत, मेहंदी यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे दोन्ही कुटुंबावर आर्थिक ताण वाढत असून वेळेचाही मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे.
मराठा समाजातील अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य अर्थात मागासलेली आहेत. बहुतांश तरुण रोजंदारीवर काम करणारे आहेत. मात्र लग्नसराईच्या काळात नातेवाईक किंवा मित्रांच्या लग्नासाठी आठवडाभर सुट्ट्या घेतल्या जातात. त्यामुळे मराठा समाजाच्या या कुटुंबाची आर्थिक घडी विस्कळीत होत असून या बाबींकडे गांभीर्याने पाहिले जात नाही ही खेदजनक बाब आहे.
सध्या चर्चेचा विषय ठरत आहे तो म्हणजे मुहूर्तावर विवाह न लागणे. लग्नापूर्वी काढली जाणारी वरात प्रतिष्ठेचा विषय बनली आहे. डीजे आणि डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजात तरुणाई तासन्तास वरातीत नाचत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे या वरातीत महिला वर्ग अग्रभागी असतात. परिणामी वाहतुकीला अडथळा निर्माण होतो तसेच वेळेचे भान राहत नाही. विवाहासाठी वेळ काढून आलेल्या पाहुण्यांचा यामुळे हिरमोड होतो. अनेकदा मुहूर्त टळून गेल्यानंतर दोन-दोन तासांनी अक्षता पडल्याचे प्रकार देखील घडत आहेत. कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास ही मंडळी त्यांच्याशी हुज्जत घालण्यास देखील मागेपुढे पाहत नाही. समारंभासाठी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच हृदयरोग मधुमेह यासारख्या आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्ती उपस्थित असतात यांना डॉल्बीच्या मोठ्या आवाजाचा त्रास सहन करावा लागतो. मात्र उत्साहाच्या भरात त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. समाजात सुरू असलेल्या या चुकीच्या प्रथांमध्ये बदल होणे काळाची गरज आहे यासाठी व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे. बेळगाव शहरात विविध मराठा समाज संघटना कार्यरत असून समाज हितासाठी अनेक उपक्रम राबविले जातात याच माध्यमातून विवाह पद्धतीतील चुकीच्या प्रथांविषयी जागृती करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. शहरातील सर्व मंगल कार्यालयांनी विवाह सोहळे नियोजित वेळेत पूर्ण होण्यासाठी नियमावली तयार करणे गरजेचे आहे. कार्यालय देताना वेळेत विवाह लावण्याबाबत अटी घालण्यात याव्यात तसेच विवाह विधी करणाऱ्या पुरोहितांनी देखील वेळेचे महत्व अधोरेखित करत वेळेत उपस्थित न राहणाऱ्या वधू-वरांच्या विवाह विधी न करण्याचा कठोर निर्णय घेतल्यास समाजात शिस्त निर्माण होऊ शकते त्याचप्रमाणे प्रत्येक परिसरातील ज्येष्ठ नागरिक पंचमंडळी आणि समाजप्रमुखांनी पुढाकार घेत विवाह सोहळे वेळेत आणि साधेपणाने पार पाडण्यासाठी समाजाला प्रवृत्त करणे आवश्यक आहे. हिंदू विवाह संस्काराचे पावित्र्य जपत समाजात शिस्त, वेळेचे महत्व आणि परंपरांचा आधार टिकून ठेवणे हीच आजची खरी गरज असल्याची भावना समाजातून व्यक्त होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta