Monday , September 21 2026
Breaking News

…..हा तर “सिरीयस फायनान्शिअल फ्रॉड” : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

Spread the love

 

बेळगाव : विविध प्रकारच्या आर्थिक फसवणुकींच्या घटना घडत आहेत. या संदर्भात पोलीस आयुक्त गेल्या सहा महिन्यांपासून अशा प्रकारच्या घटनांवर बारीक नजर ठेवून आहेत. गेल्याच महिन्यात आर्थिक फसवणुकीच्या घटनांच्या चौकशीसाठी स्कॅम सेल स्थापन करण्यात आले होते. त्यानुसार विविध प्रकारे मिळालेल्या माहितीच्या आधारे शिवम असोसिएटस संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू झाली आहे. चौकशीच्या प्राथमिक तपासात 50 कोटींहून अधिक गैरव्यवहार झाल्याचा अंदाज दिसून येत आहे. हा एक सिरीयस फायनान्शिअल फ्रॉड असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

शिवम असोसिएट संस्थेच्या कार्यालयावर जिल्हा प्रशासन आणि सहकार विभागाने टाकलेल्या छाप्यानंतर हे प्रकरण आता राज्यभर चर्चेचा विषय बनले आहे. उच्च परताव्याचे आमिष दाखवत कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक उभी केल्याचा आरोप असलेल्या या संस्थेविरोधातील कारवायांमुळे हजारो गुंतवणूकदारांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आजच्या पत्रकार परिषदेत शिवम असोसिएटस संस्थेच्या आर्थिक गैरव्यवहारा बाबत सुरू असलेल्या चौकशीची प्राथमिक माहिती माध्यमांसमोर सादर केली.

यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले, आर्थिक फसवणुकींच्या प्रकारांसंदर्भात बारीक नजर ठेवण्यासाठी बनविण्यात आलेल्या विशेष स्कॅम सेल माध्यमातून मोठ्या रकमेच्या आर्थिक व्यवहारांवर बारीक नजर ठेवली जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे चौकशी करून योग्य ती कारवाई केली जात आहे. याच पद्धतीने पोलीस आयुक्तांनी शिवम असोसिएट च्या अवैद्य ठेवींबाबत तपासाला सुरुवात केली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तब्बल 35 हजार लोकांनी या संस्थेत ठेवी ठेवलेल्या आहेत. प्राथमिक अंदाजानुसार या संस्थेत पन्नास कोटींहून अधिक रुपयांचे व्यवहार झाले असल्याचे दिसून येत आहे. मार्केटिंग इंटेलिजन्सच्या माध्यमातूनही माहिती गोळा करण्यात आली आहे. संस्थेच्या चार ठिकाणी झालेल्या कारवाई अंतर्गत महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे संस्थेने नियमबाह्यरित्या आर्थिक व्यवहार कशाप्रकारे केले आहेत याचीही कसून चौकशी केली जात आहे. या संस्थेने प्रसारित केलेल्या जाहिराती तसेच माध्यमांमधून आलेल्या माध्यमातील बातम्यांच्या आधारांवर चौकशी सुरू आहे.

प्रथमदर्शनी हाती मिळालेल्या माहितीचा अहवाल महसूल विभागाबरोबरच सरकारलाही पाठविण्यात आला आहे. संस्थेच्या आर्थिक तसेच इतर अन्य साधनसामग्रीवर निर्बंध लादण्यात आले आहेत. संस्थेच्या विरोधात काल रात्री गुन्हा दाखल झाला आहे. अजूनही बरीच चौकशी होणे बाकी आहे.चौकशीत कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये याबाबतची खबरदारी ही घेण्यात येत आहे. गेल्या काही काळात प्रशासनाच्या वतीने सातत्याने फसव्या आर्थिक योजनांना बळी पडू नका. आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या संस्थांपासून सावध राहा असे आवाहन केले जात आहे.नियमानुसार आर्थिक व्यवहार होत असलेल्या संस्थांमध्येच गुंतवणूक करा असा सल्लाही यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बोलताना दिला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *