Sunday , July 26 2026
Breaking News

शिवम असोसिएट्स आर्थिक व्यवहार प्रकरणी पहिली तक्रार दाखल

Spread the love

 

बेळगाव : बेळगावातील शिवबसवनगर परिसरातील शिवम असोसिएट्स या कथित आर्थिक व्यवहार प्रकरणात पहिल्यांदाच एका गुंतवणूकदाराने पुढे येत तक्रार नोंदवली आहे. आतापर्यंत हजारो गुंतवणूकदारांचा उल्लेख होत असतानाही कोणीही अधिकृत तक्रार केली नव्हती. त्यामुळे या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

महसूल, सहकार आणि पोलीस विभागाच्या संयुक्त कारवाईदरम्यान संस्थेकडून सुमारे ४.५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती पुढे आली होती. यानंतर सहकार खात्याच्या उपनिबंधकांच्या तक्रारीवरून संस्थेचा चालक शिवानंद निलन्नावर याला अटक करण्यात आली. पुढील तपासासाठी त्याची रवानगी सीआयडीकडे करण्यात आली आहे.

दरम्यान, गुंतवणूकदारांकडून तक्रार येत नसल्याने विविध तर्कवितर्क लावले जात होते. बचाव पक्षाचे वकील ॲड. मंजुनाथ जी. एल. यांनीही याच मुद्द्यावर भाष्य केले होते.

आता कागवाड पोलिस ठाण्यात कृष्णा आप्पाना अप्राज यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, त्यांनी शिवानंद निलन्नावर याच्याकडे ५ लाख रुपये गुंतवले होते. त्या रकमेवर ३६ टक्के व्याजासह मुद्दल एप्रिलपर्यंत परत करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या पहिल्या तक्रारीनंतर तपासाची गती वाढण्याची शक्यता व्यक्त होत असून, इतर गुंतवणूकदारही पुढे येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *