Sunday , July 26 2026
Breaking News

परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा इशारा

Spread the love

 

“काम नाही तर वेतन नाही”;शिस्तभंग कारवाईचा इशारा

बंगळूर : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी येत्या २० मेपासून पुकारलेल्या बेमुदत संपाला आळा घालण्यासाठी राज्य सरकार आणि परिवहन महामंडळ प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. “काम नाही तर वेतन नाही” या तत्त्वानुसार संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

केएसआरटीसीचे व्यवस्थापकीय संचालक अक्रम पाशा यांनी यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केला असून, संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे.

नागरिकाना अखंड आणि सुरळीत परिवहन सेवा उपलब्ध करून देणे ही महामंडळाची जबाबदारी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने परिवहन सेवेला अत्यावश्यक सेवा कायद्यांतर्गत (एस्मा) समाविष्ट केले असून, कर्मचाऱ्यांनी संप पुकारू नये तसेच कोणालाही त्यासाठी प्रवृत्त करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.

सरकारने परिवहन महामंडळांच्या सेवांना “सार्वजनिक अत्यावश्यक सेवा संस्था” म्हणून घोषित केले आहे. सध्या संपाच्या नोटिशीबाबतचा वाद कामगार आयुक्तांसमोर सामोपचार चर्चेत असल्याने, चर्चा सुरू असताना कर्मचाऱ्यांना संप करण्यास नियमांनुसार मनाई असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

विभागीय अधिकाऱ्यांना विशेष सूचना

२० मेपासून प्रवाशांच्या वाहतुकीत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सर्व विभागीय अधिकाऱ्यांना आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

रजा रद्द

२० मेपासून अत्यावश्यक परिस्थिती वगळता कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या रजा मंजूर करण्यात येणार नाहीत. आवश्यकता भासल्यास साप्ताहिक सुट्ट्याही रद्द करून कर्मचाऱ्यांना कामावर बोलावले जाऊ शकते, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

वेतन कपात आणि शिस्तभंग कारवाई

संपाच्या काळात कामावर गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची दिवसनिहाय आणि विभागनिहाय यादी तयार करून संबंधित दिवसांचे वेतन कपात करण्यात येणार आहे.

उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाच्या आदेशानुसार अनधिकृतरीत्या गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध वेतन कपातीसह विभागीय शिस्तभंगाची कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार प्रशासनाला असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यातील जनतेच्या हिताचा विचार करून कर्मचाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत संपात सहभागी न होता नियमित कर्तव्यावर हजर राहावे, असे आवाहन केएसआरटीसी प्रशासनाने केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

महामार्गालगतच्या ढाबे, हॉटेल, विक्री केंद्रांवर ग्रामपंचायतींकडून शुल्क आकारणी

Spread the love  बंगळूर : ग्रामपंचायत हद्दीतील राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत कार्यरत असलेल्या तात्पुरत्या ग्रॅनाइट-मार्बल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *