Monday , September 21 2026
Breaking News

बेळगाव महापालिकेतील भाजप नगरसेवकांवर कन्नड संघटनांचा संताप; ‘कर्नाटक पर’ ठरावाला पाठिंबा नसल्याचा आरोप

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेत “बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे” असा ठराव मंजूर करण्याच्या मागणीवरून राजकीय वातावरण तापले असून, या मुद्द्यावर सत्ताधारी भाजपमधील काही मराठीभाषिक नगरसेवकांनी पाठिंबा न दिल्याचा आरोप करत विविध कन्नड संघटनांनी भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
कन्नड संघटनांच्या प्रतिनिधींनी या संदर्भात भाजप आमदार भालचंद्र जारकीहोळी यांची भेट घेत निवेदन सादर केले. जय कर्नाटक जनपर वेदिकेचे जिल्हाध्यक्ष शिवारेड्डी हुच्चरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने बेळगाव महानगरपालिकेत कर्नाटक समर्थक ठराव मंजूर करण्यात होत असलेल्या विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली.
कन्नड संघटनांनी असा आरोप केला की, 26 मार्चपासून या मागणीसाठी सातत्याने आंदोलन सुरू असतानाही महापौर आणि उपमहापौर यांनी दिलेल्या आश्वासनांनुसार कार्यवाही झालेली नाही. विशेषतः सत्ताधारी भाजपमधील काही मराठीभाषिक नगरसेवकांनी या ठरावाला पाठिंबा न दिल्याने कन्नड भाषिकांच्या भावनांचा अवमान झाल्याचा दावा संघटनांनी केला.
यावर प्रतिक्रिया देताना आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी, बेळगाव महानगरपालिकेत कर्नाटक समर्थक ठराव मंजूर करण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही. बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग असल्याचा ठराव मंजूर व्हावा, या मागणीशी आम्ही सहमत आहोत. यासंदर्भात लवकरच महापौर, उपमहापौर आणि कन्नड संघटनांची संयुक्त बैठक बोलावली जाईल, असे आश्वासन दिले.
या भेटीवेळी कन्नड संघटनांचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बेळगावच्या सीमाप्रश्नावरून आधीच संवेदनशील असलेल्या वातावरणात या नव्या घडामोडीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *