Sunday , July 26 2026
Breaking News

साहित्यिकांनी समाजाला दिशा द्यावी; बेळगाव साहित्य संमेलनात डॉ. यशवंत पाटणे यांचे आवाहन

Spread the love

 

बेळगाव : समाजात वाढत चाललेल्या धार्मिक, भाषिक आणि सामाजिक दुभंगाच्या पार्श्वभूमीवर साहित्यिकांनी निर्भयपणे सत्य मांडत समाजाला योग्य दिशा देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत पाटणे यांनी केले. मातृभाषा ही केवळ संवादाचे साधन नसून संस्कृतीची ओळख आणि समाजाच्या अस्मितेचा पाया असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव जिल्हा शाखा आणि मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 7 व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. खानापूर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज संमेलन नगरी येथे हे संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

“मातृभाषा आणि संस्कृती या माणसाला मिळालेल्या अमूल्य गोष्टी आहेत. मातृभाषेतून मिळणाऱ्या शिक्षणाला संस्कृतीचा गंध असतो. कोणतीही भाषा व्यवसायासाठी उपयुक्त ठरू शकते; मात्र साहित्यिक, कवी आणि कलाकार घडविण्यासाठी मातृभाषेचे संस्कार आवश्यक असतात,” असे डॉ. पाटणे यांनी सांगितले.

सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी मूल्यहीन राजकारण, वाढता चंगळवाद आणि द्वेषाच्या वातावरणाबद्दल चिंता व्यक्त केली. “समाजातील सामान्य माणूस, शेतकरी आणि कामगार यांचा आक्रोश वाढत आहे. अशा वेळी साहित्यिकांनी समाजमन जागृत करण्याची भूमिका पार पाडली पाहिजे,” असे ते म्हणाले.

संमेलनाची सुरुवात ग्रंथपूजन आणि ग्रंथदिंडीने झाली. त्यानंतर विविध मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज संमेलन नगरी, कै. अजितदादा पवार सभागृह, कविवर्य नारायण सुर्वे ग्रंथदालन आणि पॉलिहाइड्रॉन व्यासपीठाचे उद्घाटन करण्यात आले. संत ज्ञानेश्वर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, स्वामी विवेकानंद, कुसुमाग्रज आणि संत तुकाराम यांच्या प्रतिमांचे पूजनही करण्यात आले.

संमेलनाचे उद्घाटन उद्योजक आणि मराठा मंदिरचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते झाले. स्वागताध्यक्ष संजय गुरव यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर एल. पी. पाटील यांनी प्रास्ताविक सादर केले. यावेळी सीमाकवी रवींद्र पाटील, ॲड. सुधीर चव्हाण, महादेव चौगुले, डी. बी. पाटील, रणजीत चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.

दुसऱ्या सत्रात “छत्रपती शिवराय : आजच्या काळाची गरज” या विषयावर पुण्याचे शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांनी व्याख्यान दिले. तर तिसऱ्या सत्रात मुंबईचे लोककवी प्रशांत मोरे यांच्या “काळजातल्या कविता” या काव्यमैफलीने रसिकांची दाद मिळवली.

संमेलनाचे सूत्रसंचालन डी. बी. पाटील आणि स्मिता किल्लेकर यांनी केले. बेळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध भागांतून साहित्यप्रेमी, कवी आणि लेखक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *