Sunday , July 26 2026
Breaking News

४,५०० कोटी घोटाळा प्रकरण : आलिशान कार भेट प्रकरणी करवे जिल्हाध्यक्ष आर. अभिलाष सीआयडीसमोर हजर

Spread the love

 

बेळगाव : बेळगावमध्ये प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या तब्बल ४,५०० कोटी रुपयांच्या कथित ठेवधारक फसवणूक प्रकरणाचा सीआयडी तपास अंतिम टप्प्यात पोहोचला असून या प्रकरणातील तपासाची व्याप्ती वाढत आहे. मुख्य आरोपी शिवानंद नीलण्णावर याच्याकडून आलिशान कार भेट म्हणून स्वीकारल्याच्या आरोपावरून ‘कर्नाटक रक्षण वेदिके’ (प्रवीण शेट्टी गट) चे जिल्हाध्यक्ष तथा अभिनेते आर. अभिलाष यांची मंगळवारी सीआयडीकडून चौकशी करण्यात आली.

माहितीनुसार, सीआयडीने पाठवलेल्या नोटिसीनंतर आर. अभिलाष यांनी माळमारुती पोलीस ठाण्यात हजर राहत संबंधित आलिशान कारची मूळ कागदपत्रे सादर केली. तपासादरम्यान मुख्य आरोपी शिवानंद नीलण्णावर याने ‘बेळगाव उत्सव’ कार्यक्रमानंतर अभिलाष यांना सुमारे १७ लाख रुपये किमतीची सेकंड-हँड मर्सिडीज बेंझ कार भेट दिल्याचा दुवा समोर आल्याची माहिती मिळत आहे.

ही कार कथित आर्थिक गैरव्यवहारातून मिळालेल्या निधीतून खरेदी करण्यात आली होती का, याचा तपास सीआयडी करत आहे. कार खरेदी प्रक्रिया, मालकी हक्क आणि संबंधित आर्थिक व्यवहारांची माहिती अधिकाऱ्यांनी तपासली असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, या प्रकरणात सीआयडीने शिवानंद नीलण्णावर यांची पत्नी तसेच त्यांचे व्यावसायिक भागीदार सुभाष यांनाही नोटिसा बजावून चौकशी केली आहे. या संपूर्ण प्रकरणात महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले असून तपास पूर्णत्वाकडे झुकत असल्याचे सूत्रांकडून समजते.

मुख्य आरोपी शिवानंद नीलण्णावर यांना पुढील न्यायालयीन प्रक्रियेसाठी बुधवारी न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता असून या घडामोडींमुळे बेळगावच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *