Sunday , July 26 2026
Breaking News

उत्तर विभाग आयजीपी संदीप पाटील यांनी स्वीकारला पदभार

Spread the love

 

बेळगाव : वरिष्ठ पोलीस अधिकारी संदीप पाटील यांनी गुरुवारी उत्तर विभागाचे नवीन आयजीपी म्हणून अधिकृतपणे पदभार स्वीकारला. यापूर्वी या पदावर कार्यरत असलेले आयजीपी चेतन सिंग राठोड यांनी संदीप पाटील यांच्याकडे पदभार सुपूर्द केला.

बेळगाव मुख्यालय असलेल्या उत्तर विभागाच्या पोलीस प्रशासनातील हा महत्त्वपूर्ण बदल मानला जात आहे. आपल्या कार्यकाळात उल्लेखनीय सेवा बजावणारे चेतन सिंग राठोड यांनी नवनियुक्त आयजीपी संदीप पाटील यांचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या. यानंतर पोलीस विभागातर्फे राठोड यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.

नवीन आयजीपी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संदीप पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. उत्तर विभागातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाकडे आशेने पाहिले जात आहे.

संदीप पाटील हे बेळगावसाठी नवीन नाव नाही. त्यांनी २०१० ते २०१३ या कालावधीत बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून काम करताना कठोर शिस्त, प्रभावी प्रशासन आणि गुन्हेगारीविरोधातील कारवाईमुळे विशेष छाप पाडली होती. पोलीस आयुक्तालय अस्तित्वात नसतानाही त्यांनी संपूर्ण जिल्ह्यावर प्रभावी नियंत्रण ठेवत गुन्हेगारीला आळा घातला होता.

त्यांच्या कार्यकाळातील ‘जनता दर्शन’ हा उपक्रम विशेष लोकप्रिय ठरला होता. या उपक्रमातून गरीब, मध्यमवर्गीय आणि शेतकरी वर्गाच्या अनेक समस्या थेट सोडवण्यात आल्या होत्या. त्यांच्या अनुभवसंपन्न नेतृत्वामुळे उत्तर विभागातील पोलीस यंत्रणा अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, संदीप पाटील यांच्या पुनरागमनामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटकांमध्ये धास्ती निर्माण झाल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *