Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगावमध्ये कार अडवून दरोडा; कट रचणाऱ्या मित्रांसह आठ जण गजाआड

Spread the love

 

बेळगाव : गोव्याला जाणाऱ्या सुवर्ण कारागिरांची कार अडवून पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवत दरोडा टाकल्याप्रकरणी बेळगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत आठ आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून रोकड, वाहने, शस्त्रे आणि इतर साहित्य असा एकूण 40.50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील मूळ रहिवासी आणि सध्या शहापूर येथे वास्तव्यास असलेले एस. के. इबादुल यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. इबादुल हे त्यांचे मित्र रबीयतल गाझी आणि अली हुसेन मंडल यांच्यासह कारने गोव्याकडे जात असताना खानापूर तालुक्यातील बैलूर क्रॉसजवळ राष्ट्रीय महामार्ग 748 वर काही अज्ञातांनी त्यांची कार अडवली.

दरोडेखोरांनी तिघांनाही रस्त्यालगतच्या शेतात नेऊन पिस्तूल व चाकूचा धाक दाखवत धमकावले. त्यानंतर इबादुल यांच्याकडील 1,00,200 रुपयांची रोकड आणि रबीयतल गाझी यांच्याकडील 225 ग्रॅम सोने लुटून आरोपी फरार झाले होते.

तपासात धक्कादायक खुलासा

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना मोठा धक्का बसला. दरोड्याचा कट तक्रारदाराच्या मित्रांनीच रचल्याचे उघड झाले. रबीयतल गाझी आणि अली हुसेन मंडल यांनी शहापूरमधील सादीक तोरगल याच्या मदतीने विवेक पाटील याला 3 लाख रुपयांची सुपारी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.

विवेक पाटील याने आपल्या साथीदारांच्या मदतीने हा दरोडा घातल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. याप्रकरणी रबीयतल रुहुल अमीन गाझी, अली हुसेन कविरुद्दीन मंडल, सादीक अब्दुल रहमान तोरगल, विवेक चंद्रकांत पाटील, प्रशांत महादेव चव्हाण, नितीन राजाराम चव्हाण, दिगंबर नागेश पाटील आणि मयूर राजू घाडी यांना अटक करण्यात आली आहे.

40.50 लाखांचा मुद्देमाल जप्त

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी एक सुझुकी ब्रेझा, एक एर्टिगा, आणखी एक कार, 1,00,200 रुपयांची रोकड, देशी बनावटीचे पिस्तूल, चाकू, आठ मोबाईल फोन, एक मोटारसायकल तसेच 205 ग्रॅम वजनाचे बनावट सोन्याचे बिस्कीट जप्त केले आहे. जप्त मालाची एकूण किंमत 40,50,200 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे बेळगाव जिल्हा पोलिसांनी अल्पावधीत दरोड्याचा छडा लावत मोठे यश मिळवले आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *