Sunday , July 26 2026
Breaking News

शिवजयंती चित्ररथ स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याला शिवरत्न शेटे यांचे प्रेरणादायी व्याख्यान

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरांमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होणारा शिवजयंती उत्सव हा आज एक भव्य लोकोत्सव बनला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा, पराक्रमाचा आणि राष्ट्रनिर्मितीच्या कार्याचा जागर करणाऱ्या या उत्सवामध्ये विविध मंडळांकडून साकारण्यात येणारे चित्ररथ आणि ऐतिहासिक देखावे हे विशेष आकर्षण ठरतात. शिवचरित्रातील प्रसंग, स्वराज्याचा इतिहास आणि समाजप्रबोधनाचा संदेश देणाऱ्या या देखाव्यांमुळे शिवजयंती उत्सवाला एक वेगळी उंची प्राप्त होत असते.

या उत्कृष्ट कार्याची दखल घेत चित्ररथ देखाव्यांचे सादरीकरण करणाऱ्या मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी शिवजयंती चित्ररथ महामंडळ आणि डॉ. रवी पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या चित्ररथ उत्कृष्ट देखावा स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण समारंभ रविवार, दिनांक ७ जून २०२६ रोजी गांधी भवन येथे संपन्न होणार आहे.

या सोहळ्यास शहरातील विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, शिवप्रेमी, चित्ररथ मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार असून हा कार्यक्रम शिवभक्तांसाठी एक प्रेरणादायी पर्वणी ठरणार आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून ख्यातनाम शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांचे “शिवरायांच्या जीवनातून काय शिकावे?” या विषयावरील विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीने, प्रभावी वक्तृत्वशैलीने आणि शिवचरित्रावरील गाढ अभ्यासाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे डॉ. शेटे हे आजच्या पिढीसमोर शिवरायांच्या जीवनातील नेतृत्व, स्वाभिमान, संघटनशक्ती, दूरदृष्टी आणि राष्ट्रनिष्ठेचे धडे उलगडून सांगणार आहेत. त्यांचे हे व्याख्यान उपस्थितांना नवी प्रेरणा, नवा विचार आणि समाजकार्यासाठी नवी ऊर्जा देणारे ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

चित्ररथ स्पर्धेत सहभागी झालेल्या मंडळांच्या कार्याचा गौरव करण्याबरोबरच शिवचरित्राच्या विचारांची नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणारा हा कार्यक्रम ठरणार असून, शिवभक्तांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सविस्तर स्वरूप आणि मान्यवरांची यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *