बेळगाव : शहरातील भातकांडे स्कूल रस्ता दुरुस्तीच्या कामास अखेर बुधवारी प्रारंभ झाला. गेल्या अनेक महिन्यांपासून खड्डे, धुळीचे साम्राज्य आणि वाहतूक कोंडीच्या समस्यांनी त्रस्त झालेल्या या मार्गाला अखेर दिलासा मिळाल्याने व्यापारी, वाहनधारक आणि नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
भातकांडे शाळेसमोरील या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. व्यापारी व्यवहारांसाठी चारचाकी वाहनांची सतत ये-जा सुरू असते, तर अवजड वाहनांचाही या मार्गावर मोठा वापर होतो. याशिवाय परिसरातील शाळेमुळे विद्यार्थ्यांची आणि पालकांचीही सतत गर्दी असते. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे आणि धुळीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
विशेषतः उन्हाळ्यात धुळीच्या प्रचंड त्रासामुळे व्यापारी आणि स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी लावून धरली होती. नगरसेवक राजू भातकांडे यांच्या पाठपुराव्यामुळे तसेच स्थानिक आमदारांच्या प्रयत्नांतून अखेर दुरुस्तीच्या कामाला मुहूर्त मिळाला आहे.
दरम्यान, दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने काही काळ वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला. मात्र प्रशासनाने पर्यायी वाहतूक व्यवस्था करून गैरसोय टाळण्याचा प्रयत्न केला आहे. दुचाकी आणि लहान चारचाकी वाहनांना कपिलेश्वर कॉलनीमार्गे वळविण्यात आले असून अवजड वाहनांना तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. या वाहनांसाठी गोवा वेस मार्गे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांना याबाबत पूर्वकल्पना देण्यात आली असून आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेड्सही उभारण्यात आले आहेत.
सध्या दुरुस्तीचे काम आणि वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे सुरू असून, काम पूर्ण झाल्यानंतर एसपीएम रोडवरील वाहतूक अधिक सुरक्षित व सुकर होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या मार्गाच्या दुरुस्तीमुळे अखेर एसपीएम रस्त्याने मोकळा श्वास घेतल्याची भावना व्यक्त होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta