Monday , September 21 2026
Breaking News

सर्व्हरच्या अडथळ्यांमुळे रेशन वितरणाचा खोळंबा; जूनचे धान्य वाटप १४ जूनपासून

Spread the love

 

बेळगाव : मे महिन्यात वारंवार सर्व्हर डाऊन होणे, बायोमेट्रिक पडताळणीतील तांत्रिक अडचणी आणि दोन महिन्यांचे धान्य एकाचवेळी वितरित करण्याच्या प्रक्रियेमुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा पुरता गोंधळ उडाला होता. परिणामी अनेक रेशन दुकानदारांना महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत धान्य वितरण सुरू ठेवावे लागले. या पार्श्वभूमीवर जून महिन्याचे रेशन वितरण १४ जूनपासून सुरू होणार असून, १० जूनपासून अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून दुकानदारांना धान्याचा पुरवठा केला जाणार आहे.

गत महिन्यात लाभार्थ्यांना धान्य मिळविण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागली होती. वारंवार सर्व्हर बंद पडणे, लाभार्थ्यांची दोन वेळा बायोमेट्रिक पडताळणी करावी लागणे आणि केंद्र सरकारकडून दोन महिन्यांचे रेशन एकाचवेळी वितरित करण्याची अंमलबजावणी यामुळे वितरण प्रक्रियेला मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी लाभार्थ्यांची गर्दी वाढल्याने रेशन दुकानदारांना रात्री उशिरापर्यंत, काही ठिकाणी रात्री १० वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवून धान्य वाटप करावे लागले.

जून महिन्यातही राज्य सरकारकडून दोन महिन्यांचे धान्य एकत्रितपणे वितरित केले जाणार आहे. त्यासाठी दोनदा बायोमेट्रिक पडताळणी करण्याच्या सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिल्या आहेत. मात्र, यामुळे वेळेचा अपव्यय होत असून सर्व्हरवरील ताणही वाढत असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे.

त्यामुळे एकदाच बायोमेट्रिक पडताळणी करून दोन महिन्यांचे धान्य वितरित करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शहर आणि ग्रामीण भागातील रेशन दुकानदारांनी केली आहे. तांत्रिक अडचणींवर तातडीने उपाययोजना करून वितरण प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान करावी, अशी अपेक्षा लाभार्थी आणि दुकानदारांकडून व्यक्त होत आहे.

रात्री १० पर्यंत धान्य वाटप

मे महिन्यातील वितरण प्रक्रियेदरम्यान सर्व्हरच्या वारंवार येणाऱ्या अडचणींमुळे अनेक रेशन दुकानांमध्ये लाभार्थ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ग्राहकांना विनाकारण हेलपाटे मारावे लागू नयेत म्हणून अनेक दुकानदारांनी रात्री उशिरापर्यंत सेवा देत धान्य वाटप पूर्ण केले. त्यामुळे यंदा जून महिन्यात तांत्रिक यंत्रणा सक्षम ठेवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *