Sunday , July 26 2026
Breaking News

मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना मराठीत पाठ्यपुस्तके द्या; शिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदन

Spread the love

 

निपाणी : मराठी माध्यम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षणासह इतर विषयांची पाठ्यपुस्तके मराठी भाषेत उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी विविध सामाजिक, शैक्षणिक व मराठी संघटनांच्या प्रतिनिधींनी निपाणी क्षेत्र शिक्षण कार्यालयाकडे केली आहे.
यासंदर्भात क्षेत्र शिक्षणाधिकारी मा. नाईक मॅडम यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, निपाणी परिसरातील मराठी माध्यम शाळांतील विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण विषयाची पुस्तके प्रामुख्याने कन्नड भाषेत उपलब्ध होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आकलन प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असून शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांचे शिक्षण त्यांच्या मातृभाषेत अधिक प्रभावीपणे होत असल्याने मूल्यशिक्षणासारखा व्यक्तिमत्त्व विकासाशी संबंधित विषय मराठी भाषेत शिकविणे आवश्यक असल्याचे प्रतिनिधींनी नमूद केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून मूल्यशिक्षण व इतर आवश्यक विषयांची पाठ्यपुस्तके मराठी भाषेत उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी प्रा. डॉ. अच्युत माने, विजयराव देसाई (निपाणकर सरकार), शिवसेना नेते बाबासाहेब खांबे, निपाणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष जयराम मिरजकर, तुकाराम कोळी, बाबासाहेब मगदूम, अशोक खांडेकर आदी उपस्थित होते. प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *