Monday , September 21 2026
Breaking News

वडगांव येथील बेपत्ता व्यक्तीचा खानापूर येथे मृतदेह मलप्रभा नदीत आढळला; आत्महत्येचा प्राथमिक अंदाज

Spread the love

 

खानापूर : खानापूर येथील मलप्रभा नदी घाट परिसरात बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. कुंदन वसंत कलघटकर (वय ४८, रा. यरमाळ रोड, वडगाव) असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खानापूर पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुंदन कलघटकर हे गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. रविवारी दुपारनंतर ते घराबाहेर पडले होते; मात्र त्यानंतर त्यांचा कुटुंबीयांशी कोणताही संपर्क झाला नव्हता. ते खानापूरच्या दिशेने गेल्याची शक्यता लक्षात घेऊन नातेवाईक आणि मित्रमंडळींनी त्यांचा शोध सुरू केला होता.

शोधमोहीमेदरम्यान मलप्रभा नदी घाट परिसरात त्यांची दुचाकी आढळून आली. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते फिरताना दिसून आल्याने नदी परिसरात शोधकार्य तीव्र करण्यात आले. दरम्यान, नदीतील एका डोहाजवळ त्यांची चप्पल तरंगताना आढळल्याने संशय अधिक बळावला.

यानंतर एनडीआरएफच्या मदतीने नदीपात्रात शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र सुरुवातीच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यानंतर एचईआरएफ (HERF) पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाचे प्रमुख बसवराज हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली अत्याधुनिक पाण्याखालील कॅमेऱ्यांच्या साहाय्याने शोधकार्य करण्यात आले. अखेर डोहाच्या खोल भागात कुंदन कलघटकर यांचा मृतदेह आढळून आला.

या शोधकार्यात उमेश अंधारे (यडोगा) आणि रुपेश मुतगेकर (लोकोळी) यांनी विशेष योगदान दिले. घटनास्थळी खानापूर गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक श्रीमती सपाटे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला असून मृत्यूचे नेमके कारण अहवाल प्राप्त झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे खानापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *