
बेळगाव : ‘बेळगाव कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे’ या ठरावाच्या मंजुरीबाबत बेळगाव महापालिकेकडून होत असलेल्या विलंबावर आता पडदा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी महापालिका सभेत हा ठराव आपण स्वतः मांडणार असल्याची घोषणा बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी केली.
जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. बैठकीस जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. के. रामराजन, महापालिका आयुक्त कार्तिक एम. तसेच विविध कन्नड संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत कन्नड संघटनांच्या प्रतिनिधींनी गेल्या अनेक महिन्यांपासून ‘बेळगाव कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे’ तसेच ‘महाजन आयोगाचा अहवाल अंतिम मानावा’ या आशयाचा ठराव मंजूर करण्याची मागणी करण्यात येत असतानाही महापालिकेकडून कोणताही ठोस निर्णय घेतला जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
यावर महापालिका आयुक्तांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, मागील सभेत शासननियुक्त सदस्य रमेश सोंटक्की यांनी ठराव मांडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने नगरविकास विभागाचे मत घेण्याचे निर्देश महापौरांनी दिले होते.
मात्र, या स्पष्टीकरणावर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट भूमिका मांडली. या विषयात शासनाच्या अभिप्रायाची प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नसून महापालिका आपल्या अधिकारक्षेत्रात निर्णय घेऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
या संदर्भात शासनाला पत्र पाठविण्यात आले आहे का, असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर स्पष्ट उत्तर न मिळाल्याने बैठकीत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी, या विषयाबाबत अधिकृत पत्र दिल्यास नियमानुसार तपासणी करून आवश्यक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी आमदार आसिफ सेठ म्हणाले की, “बेळगाव कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे, हे निर्विवाद सत्य आहे. त्यामुळे आगामी महापालिका सभेत हा ठराव मी स्वतः मांडणार आहे.”
बैठकीत उपस्थित कन्नड संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी ठराव सभागृहात मांडल्यास समितीच्या काही सदस्यांचा अपवाद वगळता बहुसंख्य नगरसेवक त्याला पाठिंबा देतील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच ठरावाला विरोध करणाऱ्यांची भूमिका जनतेसमोर यावी आणि अशा सदस्यांविरोधात शासनाकडे अहवाल सादर करून कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
बैठकीस कन्नड संघटनांच्या कृती समितीचे अध्यक्ष अशोक चंदरगी, महादेव तळवार, बलराम मासेनट्टी, श्रीनिवास ताळूकर यांच्यासह विविध कन्नड संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta