
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील मराठी शाळा आणि विद्यार्थ्यांवर भाषिक अन्याय होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून मराठी पाठ्यपुस्तके तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये कन्नडची सक्ती, मराठी पाठ्यपुस्तकांची अनुपलब्धता आणि मूल्य शिक्षण विषयासाठी मराठी पुस्तके न देणे या बाबींविषयी समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बेळगाव आणि खानापूर येथील दोन मराठी शाळांना के.पी.एस. (KPS) शाळांचा दर्जा देण्यात आला असून, त्या शाळांसाठी आवश्यक असलेली ‘मराठी-इंग्रजी’ द्विभाषिक पाठ्यपुस्तके अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत. उलट कन्नड माध्यमासाठी तयार करण्यात आलेली ‘कन्नड-इंग्रजी’ पुस्तके वापरण्यासाठी शिक्षकांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप समितीने केला आहे. त्यामुळे संबंधित शाळांना तातडीने मराठी-इंग्रजी पुस्तके उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, पूर्व-प्राथमिक वर्गांना मान्यता असलेल्या मराठी शाळांमध्ये द्विभाषिक अभ्यासक्रम राबविण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. पहिली ते पाचवीपर्यंत मातृभाषा आणि इंग्रजी, तर त्यानंतर संपूर्ण शिक्षण इंग्रजीतून देण्याच्या धोरणामुळे मराठी भाषा, विद्यार्थी आणि शिक्षकांवर गंभीर परिणाम होणार असल्याचे समितीने म्हटले आहे. मराठी शाळा या पूर्णपणे मराठी माध्यमाच्या राहाव्यात, अशी भूमिका समितीने मांडली आहे.
दरम्यान, राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘मूल्य शिक्षण’ विषयाची पुस्तके मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत उपलब्ध नसल्याचा मुद्दाही समितीने उपस्थित केला आहे. ही पुस्तके सध्या केवळ कन्नड आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध असल्याचे नमूद करत भारतीय राज्यघटनेतील कलम 350(अ) नुसार भाषिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मातृभाषेत शिक्षण मिळणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
मूल्य शिक्षण विषयाची मराठी पुस्तके उपलब्ध होईपर्यंत हा विषय मराठी शाळांमध्ये शिकवू नये तसेच तातडीने मराठी भाषेतील पाठ्यपुस्तके उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
भाषिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांवरील अन्याय तातडीने दूर न झाल्यास महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
दरम्यान, निवेदन देण्यासाठी युवा समिती कार्यकर्ते गेलो असता तिथे जिल्हा शिक्षणाधिकारी अथवा संबंधित अधिकारी उपस्थित नव्हते, उपस्थित अधिकारी निवेदन घेण्यासाठी टाळाटाळ करत होते, या विषयावर बोलण्यासाठी त्यांच्याकडे उत्तर नसल्याने असे सगळे अधिकारी गायब झाल्याचा आरोप समिती नेते मदन बामणे यांनी केला. पण जोपर्यंत याबाबत सोक्षमोक्ष लावून मराठी विद्यार्थी आणि शाळांवरील अन्याय आणि कन्नड सक्ती दूर करण्यात येणार नाही तोपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.
निवेदन देतेवेळी युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, युवा नेते आर. एम. चौगुले, मदन बामणे, सुनील बाळेकुंद्री, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, उपाध्यक्ष यल्लाप्पा (वासु) सामजी, गुंडू (राजू) कदम, खजिनदार विनायक कावळे, किरण हुद्दार, आकाश बेकने आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta