Tuesday , June 9 2026
Breaking News

आंबोळी गावातील जळालेल्या ट्रान्सफॉर्मरकडे हेस्कॉमचे दुर्लक्ष; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

Spread the love

 

खानापूर : तालुक्यातील आंबोळी गावात वीज कोसळून ट्रान्सफॉर्मर जळून गेल्याची घटना सुमारे महिनाभरापूर्वी घडली असून, याबाबत वारंवार सूचना देऊनही संबंधित हेस्कॉम अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ग्रामस्थांच्या माहितीनुसार, अचानक वीज कोसळल्यामुळे गावातील ट्रान्सफॉर्मर जळाला होता. या घटनेची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ देण्यात आली होती. मात्र, तब्बल महिनाभर उलटूनही ट्रान्सफॉर्मर बदलण्यात आलेला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून शाळकरी विद्यार्थ्यांनाही अभ्यासासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, ५ जून रोजी दुपारच्या सुमारास गावालगतच्या सर्व्हे क्रमांक ३/६ मधील शेतकरी नामदेव गणपत कुरसेकर (देसाई) यांच्या शेतात आणखी एक दुर्घटना घडली. त्यांच्या शेतातून गावातील ट्रान्सफॉर्मरकडे जाणाऱ्या विद्युत तारा असल्याने ट्रान्सफॉर्मरच्या बिघाडामुळे शॉर्टसर्किट होऊन शेतातील गवताला आग लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आगीत मोठ्या प्रमाणात गवत जळून खाक झाले असून शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे.

विशेष म्हणजे, घटना घडून अनेक दिवस उलटूनही खानापूर हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा किंवा पाहणी केलेली नसल्याचा आरोप शेतकरी व ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्याने न्याय आणि नुकसानभरपाईची मागणी कोणाकडे करावी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, शेतकऱ्याला तातडीने नुकसानभरपाई द्यावी आणि आंबोळी गावातील जळालेला ट्रान्सफॉर्मर त्वरित बदलून नियमित वीजपुरवठा सुरू करावा, अशी जोरदार मागणी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

हेम्माडगा बससेवा अखेर सुरू; ग्रामस्थांच्या दीर्घ प्रतीक्षेला पूर्णविराम

Spread the love  खानापूर : हेम्माडगा गावासाठी नवीन बससेवा आज सोमवारपासून सुरू करण्यात आली असून, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *