
निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात सर्वच ठिकाणी ऊर्जेचा वापर केला जात आहे. त्यामध्ये घरातील विद्युत व्यवस्था लहान-मोठे उद्योगांचा समावेश आहे. त्यामुळे वीज ही प्रत्येक नागरिकाच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनली आहे. त्यामुळेवीज हा जनतेचा मूलभूत अधिकार आहे, ही आमची ठाम भूमिका आहे. परंतु. सार्वजनिक हिताला बाजूला करून जनसामान्यांच्या या मूलभूत हक्कांवर खाजगी कंपन्यांचे आक्रमण करण्याचा घाट घातला आहे. त्याविरुद्ध
कर्नाटक राज्य रयत संघटना आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असे मत कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी व्यक्त केले. रयत संघटनेच्या बैठकीत ते बोलत होते.
पोवार म्हणालेसध्या टाटा पॉवर कंपनीला वीज वितरणाचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू आहेत. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने आणि आपल्या हक्काच्या ‘वीज स्वातंत्र्याचे’ रक्षण करण्यासाठी या खाजगीकरणाला आमचा तीव्र विरोध आहे. हा विरोध केवळ एका कंपनीला नाही, तर त्यामागे असणाऱ्या जनविरोधी धोरणांना आहे.
खाजगीकरणामुळे वाढणारा अन्याय
वीज क्षेत्राचे खाजगीकरण सामान्य जनतेसाठी कधीही भूषणावह ठरू शकत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे खाजगी कंपन्यांचा मूळ उद्देश केवळ ‘नफा कमावणे हा आहे. टाटा पॉवरसारख्या खाजगी कंपनीला परवाना मिळाल्यास वीज दरांमध्ये अनियंत्रित वाढ होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे आधीच महागाईने होरपळणाऱ्या सामान्य जनतेचे बजेट पूर्णपणे कोलमडेल.
सामान्य जनतेवर अन्याय: शेतकरी, कष्टकरी आणि मध्यमवर्गीय नागरिकांना वाढीव वीजबिलांचा नाहक त्रास सहन करावा लागेल. वीज न परवडल्यामुळे ग्रामीण आणि गरीब भागातील जनतेला अंधारात राहावे लागण्याची भीती नाकारता येत नाही. कॉर्पोरेट एकाधिकाराला आमचा नकार असून वीज व्यवस्थेवर कोणत्याही एका किंवा काही मोजक्या कॉर्पोरेट कंपन्यांचा एकाधिकार आम्हाला कदापि मान्य नाही. सार्वजनिक क्षेत्रातील मालमत्ता आणि व्यवस्था खाजगी हातात जात असल्यास सर्वसामान्य ग्राहकांचे शोषण सुरू होते. हा एकाधिकार लोकशाही आणि सामाजिक न्यायाच्या तत्त्वांच्या पूर्णपणे विरोधात आहे.
कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या माध्यमातून आम्ही जनतेला आणि सरकारला हे स्पष्ट करू इच्छितो की, आम्ही आमच्या ‘वीज स्वातंत्र्याशी’ कोणतीही तडजोड करणार नाही. जनतेच्या हक्काची वीज ही जनतेच्याच हितासाठी वापरली गेली पाहिजे. कॉर्पोरेट जगताच्या नफ्यासाठी नसून या अन्यायाविरुद्ध सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन पोवार यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta