Sunday , September 20 2026
Breaking News

हब्बनहट्टीतील कथित बॉक्साईट उत्खननावर प्रश्नचिन्ह; विविध विभागांच्या भूमिकेवर खानापूर तालुका काँग्रेसची टीका

Spread the love

 

खानापूर : हब्बनहट्टी परिसरातील लॅटराईट उत्खननाच्या परवानगीच्या आडून कथितपणे बॉक्साईटची वाहतूक व उत्खनन होत असल्याचा आरोप करत खानापूर ब्लॉक काँग्रेसने माईन्स अँड जिऑलॉजी विभाग, पोलीस प्रशासन, वन विभाग आणि आरटीओ यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

ब्लॉक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात, लॅटराईट उत्खननासाठी परवानगी देण्यात आलेल्या ठिकाणी प्रत्यक्षात बॉक्साईटची वाहतूक होत असल्यास त्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना नाही का, असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच या प्रकरणात माईन्स अँड जिऑलॉजी विभागातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे की त्याला अप्रत्यक्ष पाठबळ मिळत आहे, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, ज्या सर्व्हे क्रमांकांमध्ये अधिकृत लीज मंजूर करण्यात आली आहे, त्याच ठिकाणांहून खनिजाची वाहतूक होत आहे की इतर ठिकाणांहून साहित्य आणून लीज क्षेत्रात दाखवले जात आहे, याचीही सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

हबनहट्टी परिसरातून कथितपणे ओव्हरलोड वाहने सुरू असल्याचा दावा करत, या प्रकरणात खानापूर पोलिसांनी कोणती भूमिका घेतली आहे, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. चुकीच्या बाबींवर सर्वांसाठी समान कारवाई केली जाते की निवडक कारवाई होते, याबाबत पोलीस प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणात माईन्स अँड जिऑलॉजी विभाग, पोलीस प्रशासन, वन विभाग आणि आरटीओ यांच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. संबंधित विभागांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग तपासला जावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, हबनहट्टी प्रकरणाशी संबंधित सर्व माहिती आणि आरोप लवकरच राज्याचे नूतन गृहमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले जाणार असल्याचा इशारा खानापूर ब्लॉक काँग्रेसने दिला आहे.

या आरोपांबाबत संबंधित विभागांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *