Sunday , July 26 2026
Breaking News

आचारसंहिता संपल्यानंतर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीची तारीख जाहीर होणार

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्रातील आचारसंहिता संपल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीची तारीख जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत दादा कोंडुसकर यांना दिली.

मुंबई येथील मंत्रालयात ९ जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर कोंडुस्कर यांनी उद्योगमंत्री सामंत यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. यावेळी सामंत यांनी मंत्रिमंडळाची बैठक सुरू असल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्री उपस्थित असल्याचे सांगत बेळगाव सीमा भागातील विविध प्रश्नांची माहिती शासनाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे आश्वासन दिले.

मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर मंत्री सामंत यांनी पुन्हा कोंडुस्कर यांच्याशी संपर्क साधून आचारसंहितेमुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची बैठक तातडीने घेणे शक्य नसल्याचे सांगितले. आचारसंहिता संपल्यानंतर बैठकीची तारीख निश्चित करून जाहीर केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच बेळगाव सीमा भागातील विविध प्रश्नांबाबतची सविस्तर माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बैठकीदरम्यान पत्राद्वारे सादर करण्यात आल्याची माहितीही सामंत यांनी दिली.

दरम्यान, बेळगाव परिसरातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि इतर संस्थांना महाराष्ट्र शासनाकडून आतापर्यंत दीड कोटी रुपयांहून अधिक आर्थिक मदत वितरित करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. या मदतीच्या अनुषंगाने बेळगाव येथे लवकरच विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला. या कार्यक्रमाच्या पाठपुराव्याची जबाबदारी महाराष्ट्र एकीकरण समितीचे वैद्यकीय समन्वयक आनंद आपटेकर यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

यावेळी कोंडुस्कर यांनी कार्यक्रमाचे नियोजन प्रभावीपणे करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच बेळगाव सीमा भागातील सामाजिक, शैक्षणिक व इतर अडीअडचणींबाबत थेट संपर्क साधण्याचे आवाहन मंत्री सामंत यांनी केल्याची माहितीही रमाकांत कोंडुस्कर यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *