Monday , September 21 2026
Breaking News

महागाईची झळ सलून व्यवसायालाही; दाढी-केस कर्तनाच्या दरात २० टक्क्यांची वाढ

Spread the love

 

बेळगाव : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणाऱ्या वाढत्या महागाईची झळ आता सलून व्यवसायालाही बसली आहे. वाढलेल्या खर्चाचा ताळमेळ घालणे कठीण झाल्याने शहापूर सलून असोसिएशनने दाढी, केस कर्तन आणि इतर सलून सेवांच्या दरात २० टक्क्यांची वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे नागरिकांना सलून सेवांसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून महागाईचा आलेख सातत्याने चढता राहिल्याने सलून व्यवसाय अडचणीत सापडला आहे. इंधन दरवाढीमुळे सलूनमध्ये वापरल्या जाणाऱ्या क्रीम, लोशन, पावडर, ब्लेड, शॅम्पू तसेच इतर आवश्यक साहित्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. याशिवाय दुकानांचे भाडे, कामगारांचे वेतन, वीजबिल, कर आणि देखभाल खर्च यामध्ये झालेल्या वाढीमुळे व्यावसायिकांवरील आर्थिक भार अधिकच वाढला आहे. परिणामी दरवाढीशिवाय दुसरा पर्याय उरला नसल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले.

महागाईच्या संकटासोबतच सलून व्यवसायात स्पर्धाही तीव्र होत चालली आहे. कमी दरात सेवा देणाऱ्या परप्रांतीय व्यावसायिकांमुळे स्थानिक सलून चालकांना मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेक पारंपरिक सलूनच्या ग्राहकसंख्येत घट झाल्याचेही दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर सलून सेवांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ग्राहकांनी त्याला सहकार्य करावे, अशी विनंती असोसिएशनने केली आहे. तसेच अनेक वर्षांपासून दर्जेदार आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या स्थानिक सलून व्यावसायिकांना प्राधान्य देऊन त्यांच्या व्यवसायाला बळ द्यावे, असे आवाहनही बैठकीत करण्यात आले.

“वाढत्या महागाईच्या कात्रीत सलून व्यवसाय सापडला असून, व्यवसाय टिकवण्यासाठी दरवाढ अपरिहार्य ठरली आहे,” अशी भावना सलून व्यावसायिकांनी व्यक्त केली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *