खानापूर : हब्बनहट्टी परिसरातून सुरू असलेल्या कथित बॉक्साईट वाहतुकीमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत असून ओव्हरलोड वाहनांमुळे रस्त्यांच्या टिकाऊपणावर धोका निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. सुमारे ५० टनांहून अधिक मालवाहतूक करणाऱ्या १६ चाकी ट्रकांची नियमित ये-जा होत असल्याने आधीच खराब अवस्थेत असलेल्या रस्त्यांची आणखी दुरवस्था होण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.
स्थानिकांमध्ये विशेषतः चार मुद्द्यांवरून संभ्रम आणि नाराजी व्यक्त होत आहे. हब्बनहट्टी प्रकरणात संबंधित वन विभागाकडून आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यात आले आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ग्रीन झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात खाणकामास परवानगी कशी देण्यात आली, याबाबतही नागरिक स्पष्टीकरण मागत आहेत.
तसेच खाण आणि भूगर्भशास्त्र विभागाने (माइन्स अँड जिऑलॉजी) लॅटराईट उत्खननाची परवानगी दिली असताना प्रत्यक्षात बॉक्साईटची वाहतूक होत असल्याच्या चर्चांमुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत संबंधित विभागांनी स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या आरटीओ आणि पोलीस प्रशासनाकडून या वाहनांकडे दुर्लक्ष केले जात आहे का, असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे. दिवस-रात्र सुरू असलेल्या जड वाहनांच्या वाहतुकीकडे प्रशासनाचे लक्ष कसे गेले नाही, याबाबत नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
या सर्व घडामोडींमध्ये स्थानिक आमदारांची भूमिका देखील चर्चेचा विषय ठरली आहे. ओव्हरलोड वाहनांमुळे रस्त्यांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी असूनही लोकप्रतिनिधी याबाबत मौन का बाळगत आहेत, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
हब्बनहट्टी प्रकरणातील परवानग्या, खनिज वाहतूक, ओव्हरलोड वाहनांची तपासणी आणि रस्त्यांच्या नुकसानीसंदर्भात संबंधित विभागांनी सविस्तर माहिती जाहीर करून जनतेसमोरील संभ्रम दूर करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta