Monday , September 21 2026
Breaking News

मंत्रीपद नसले तरी जनतेचा विश्वास कायम; लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या जनता दर्शनाला मोठी गर्दी

Spread the love

 

बेळगाव : माजी मंत्री आणि आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बुधवारी बेळगाव येथील त्यांच्या निवासस्थानी जनता दर्शन कार्यक्रम आयोजित करून नागरिकांच्या अडचणी आणि तक्रारी ऐकून घेतल्या.

जिल्ह्याच्या विविध भागांसह ग्रामीण आणि शहरी परिसरातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहिले. जमीन, महसूल, सामाजिक सुरक्षा योजना, महिला व बालकल्याण, पिण्याचे पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य तसेच विविध शासकीय विभागांशी संबंधित समस्या नागरिकांनी त्यांच्यासमोर मांडल्या.

मंत्रीपद नसतानाही लक्ष्मी हेब्बाळकर यांना भेटण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. सकाळपासूनच नागरिकांनी रांगा लावून आपल्या तक्रारी आणि निवेदने सादर केली. जनप्रतिनिधी म्हणून त्यांच्यावरील लोकांचा विश्वास आणि आपुलकी याचे हे द्योतक असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

प्रत्येकाची समस्या संयमाने ऐकून घेत लक्ष्मी हेब्बाळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून अनेक प्रश्नांवर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तातडीच्या प्रकरणांना प्राधान्य देऊन योग्य तो तोडगा काढण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी त्या म्हणाल्या, “जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि प्रेम हीच माझी खरी ताकद आहे. सत्ता आणि पदे तात्पुरती असतात, पण जनतेशी असलेले नाते कायमस्वरूपी असते. पद असो वा नसो, जनतेची सेवा करणे हे माझे कर्तव्य असून ते अखंडपणे सुरूच राहील.”

जनता दर्शन कार्यक्रमावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते. त्यांनी नागरिकांच्या निवेदनांची नोंद घेऊन आवश्यक सहकार्य केले.

मंत्रीपद नसतानाही लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या जनता दर्शन कार्यक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद, बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील त्यांचा जनाधार आणि लोकांशी असलेला दृढ संपर्क आजही कायम असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *