Saturday , June 13 2026
Breaking News

मराठी भाषेसाठी म. ए. समितीचा 22 जून रोजी मोर्चा; पोलिस आयुक्तांना निवेदन

Spread the love

 

बेळगाव : मराठी भाषिकांच्या हक्कांशी कन्नडसक्ती रोखण्यासाठी २२ जून रोजी बेळगावात शांततापूर्ण मोर्चा म. ए. समितीचे काढण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक परवानगी देण्याची मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने पोलिस प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात समितीच्या शिष्टमंडळाने गुरुवारी पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात माजी महापौर मालोजी अष्टेकर, अॅड. अमर येळ्ळूरकर आणि विकास कलघटगी यांचा समावेश होता. यावेळी मराठी भाषिकांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली.

समितीने दिलेल्या निवेदनात कर्नाटक भाषा सर्वांगीण विकास अधिनियम २०२२ लागू झाल्यानंतर शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांचे फलक तसेच अधिकृत कागदपत्रांमधील मराठी भाषेचा वापर कमी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय मराठी भाषेतील अनेक खासगी व्यावसायिक फलक हटविण्यात आल्याने मराठी भाषिक समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

मराठी भाषिकांना भाषिक अल्पसंख्याक म्हणून भारतीय राज्यघटनेने प्रदान केलेल्या अधिकारांवर गदा येत असल्याची भावना सीमाभागातील नागरिकांमध्ये निर्माण झाली असून, याबाबत शासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी समितीने केली आहे.

या पार्श्वभूमीवर २२ जून रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. कॉलेज रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा पोहोचणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, मोर्चापूर्वी जनजागृतीसाठी १५ ते १९ जून या कालावधीत शहरातील विविध भागांमध्ये सायंकाळी ६ ते ९ या वेळेत जनजागृती फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजीनगर, खडे बाजार, शहापूर, टिळक चौक, स्टेशन रोड, गणेशपेठ, नाथ पै सर्कल आदी भागांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती समितीने दिली.

मोर्चा आणि जनजागृती फेऱ्यांना आवश्यक परवानगी देण्याची मागणी समितीने पोलिस प्रशासनाकडे केली असून, मराठी भाषेच्या प्रश्नावर सीमाभागात पुन्हा एकदा आंदोलनाची तयारी सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

विद्यार्थ्यांना मोफत बस पास; सीमाभागातील विद्यार्थ्यांनाही लाभ

Spread the love  बेळगाव : राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रवास सुलभ व्हावा यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *