जायंट्स आय फौंडेशनच्या वतीने नेत्रदान जनजागृती
बेळगाव : राष्ट्रीय नेत्रदान जनजागृती दिनानिमित्त जायंट्स आय फौंडेशनच्या वतीने टिळकवाडी येथील बालिका आदर्श विद्यालयात नेत्रदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. शुभांगी पाटील यांनी विद्यार्थिनींना नेत्रदानाचे महत्त्व पटवून देत सविस्तर मार्गदर्शन केले.
डॉ. पाटील म्हणाल्या की, नेत्रदान हे अत्यंत पवित्र व मानवतेच्या कल्याणासाठी उपयुक्त असे दान आहे. नेत्रदानामुळे अंध व्यक्तींना दृष्टी मिळून त्यांचे जीवन प्रकाशमान होऊ शकते. मात्र नेत्रदानाबाबत अपुरी माहिती, गैरसमज आणि अंधश्रद्धा यांमुळे समाजातून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेत्रदानाचा संदेश घराघरात पोहोचवून जनजागृतीमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी त्यांनी नेत्रदानाची प्रक्रिया, त्याबाबतच्या शंका आणि गैरसमज यांचे निरसन करत विद्यार्थिनींना तपशीलवार माहिती दिली. तसेच समाजात नेत्रदान चळवळ प्रभावीपणे राबविणाऱ्या जायंट्स आय फौंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.
सन २०१८ मध्ये स्थापन झालेल्या जायंट्स आय फौंडेशनतर्फे नेत्रदान जनजागृती आणि नेत्रदान प्रसारासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जायंट्स आय फौंडेशनचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील, जायंट्स मेनचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे, फेडरेशन संचालक संजय पाटील तसेच बालिका आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. ओ. डोणकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जायंट्स मेन चे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर शिवराज पाटील यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta