Saturday , August 22 2026
Breaking News

एक लाखांच्या पुरस्काराचे ‘ज्ञानवृक्षात’ रूपांतर!

Spread the love

 

रणजीत चौगुले सरांचा अनोखा उपक्रम; व्याजातून दरवर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत

बेळगाव : काही पुरस्कार भिंतीवर लटकतात, काही कपाटात धूळ खात पडून राहतात; पण काही पुरस्कार समाजासाठी प्रेरणेचा दीप बनतात. सरकारी सरदार्स हायस्कूलचे सहशिक्षक रणजीत चौगुले यांनी मिळालेल्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे असेच एका सतत फळ देणाऱ्या ‘ज्ञानवृक्षात’ रूपांतर केले आहे.

उगार खुर्द येथे सन २०१४ मध्ये चौगुले यांना ‘रामतीर्थकर स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला होता. या पुरस्कारासोबत मिळालेली एक लाख रुपयांची रक्कम त्यांनी स्वतःसाठी न वापरता विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी राखून ठेवली. या रकमेवरील व्याजातून ते दरवर्षी आपले वडील प्रा. एल. आर चौगुले यांच्या स्मृती प्रित्यर्थ विविध शाळेतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना विविध प्रकारची शैक्षणिक मदत करतात.
याच उपक्रमांतर्गत यंदा सरकारी सरदार्स हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक एस. एस. हादिमनी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या देण्यात आल्या. यावेळी शिक्षिका मंजुषा अडके तसेच एस. बी. मुल्ला उपस्थित होते.
आजच्या काळात पुरस्काराची रक्कम वैयक्तिक गरजांसाठी वापरणे सहज शक्य असताना चौगुले यांनी मात्र ती रक्कम समाजाच्या आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी समर्पित केली. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या या उपक्रमामुळे शेकडो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाले असून अनेकांच्या शिक्षणाला नवी उभारी मिळाली आहे.
कार्यक्रमात बोलताना मुख्याध्यापक हादिमनी म्हणाले, “शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या जीवनात निर्माण केलेली प्रेरणा हीच त्याची खरी कमाई असते. चौगुले सरांनी पुरस्काराचे रूपांतर समाजोपयोगी कार्यात करून एक आदर्श निर्माण केला आहे.”
वह्या प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करत चौगुले सरांचे आभार मानले. “पुरस्कारातून मिळालेली रक्कम विद्यार्थ्यांसाठी खर्च करण्याचा विचारच आम्हाला अधिक अभ्यास करण्याची प्रेरणा देतो,” अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
शिक्षकाचा सन्मान हा केवळ त्याच्या नावापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या हातात वह्या, पुस्तके आणि शिक्षणाच्या संधी म्हणून पोहोचत असेल, तर तो सन्मान खऱ्या अर्थाने सार्थ ठरतो. रणजीत चौगुले यांचा हा उपक्रम याच विचाराचे जिवंत उदाहरण ठरत आहे.

About Belgaum Varta

Check Also

कर्जाच्या विळख्यात विणकर कामगाराची जीवनयात्रा संपली; राहुल जारकीहोळींकडून कुटुंबाला धीर

Spread the love  बेळगाव : कर्जबाजारीपणाच्या आर्थिक विवंचनेतून मंगाईनगर, वडगाव येथील एका विणकर कामगाराने गळफास …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *