Saturday , August 22 2026
Breaking News

विमा रकमेसाठी पत्नीचा कट; प्रियकराच्या मदतीने माजी सैनिकाची विष देऊन हत्या

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात तीन महिन्यांपूर्वी झालेल्या एका माजी सैनिकाच्या मृत्यूचे गूढ उकलण्याच्या दिशेने पोलिस तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. अनैतिक संबंध लपवण्यासाठी आणि सुमारे दोन कोटी रुपयांच्या विमा रकमेसाठी पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

हुक्केरी तालुक्यातील गोडगेरी येथील माजी सैनिक संदीप मंजरगी हे अपघातात जखमी झाल्यानंतर घटप्रभा येथील रुग्णालयात उपचार घेत होते. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, पत्नी सुमा हिने प्रियकर पुंडलिक यांच्या मदतीने सलाईनमध्ये कीटकनाशक मिसळून संदीप यांना विष दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर हा मृत्यू अपघाती असल्याचा बनाव रचण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.

प्रकरणातील संशय बळावल्यानंतर पोलिसांच्या विशेष तपास पथकाने बेळगावचे उपविभागीय अधिकारी (एसडीएम) श्रवणकुमार नायक यांच्या उपस्थितीत तीन महिन्यांपूर्वी दफन करण्यात आलेला मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाचे अवशेष फॉरेन्सिक तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

याबाबत बोलताना श्रवणकुमार नायक यांनी सांगितले की, फॉरेन्सिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रकरणातील सर्व बाबी स्पष्ट होतील. दरम्यान, सुरुवातीला हा मृत्यू अपघाती असल्याचे वाटत होते; मात्र पोलिसांनी केलेल्या सखोल तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचे सांगितले जात आहे.

मृत संदीप मंजरगी यांचे बंधू संजय मंजरगी यांनी पोलिसांच्या तपासाचे कौतुक करत, देशसेवा केलेल्या सैनिकाचा विश्वासघात करून हत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणाचा तपास सुरू असून फॉरेन्सिक अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

राष्ट्रीय सब ज्युनिअर जलतरण स्पर्धेत बेळगावच्या दिशा होंडीला एक सुवर्ण, दोन रौप्य पदके

Spread the love  बेळगाव : नुकत्याच जयपुर येथे झालेल्या 42 व्या राष्ट्रीय सब ज्युनिअर जलतरण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *