Friday , June 19 2026
Breaking News

दारूच्या नशेत तरुणाचा चाकूने खून; महिला दोषी ठरली, सात वर्षांचा कारावास

Spread the love

 

बेळगाव : दारूच्या नशेत किरकोळ वादातून तरुणाच्या छातीत चाकू खुपसून खून करणाऱ्या महिलेला जिल्हा व सत्र न्यायालयाने सात वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा तसेच २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मंजुनाथ नायक यांनी हा निकाल दिला.

जयश्री पवन पवार (मूळ रा. गांधीनगर, दांडेली, जि. कारवार; सध्या रा. कंग्राळी खुर्द) असे दोषी महिलेचे नाव आहे. तर या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव नागराज भीमशी रागी-पाटील (रा. तारीहाळ) असे आहे.

याप्रकरणी नागराज यांचा मित्र नागेंद्र रामा कुकडोळी यांनी मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली होती. फिर्यादी व नागराज हे ३० एप्रिल २०२३ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून जात असताना कीर्ती हॉटेलजवळील ढोर गल्ली क्रॉस परिसरात जयश्री पवार दारूच्या नशेत मोबाईलची मागणी करत होती. मोबाईल देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या जयश्रीने नागराज यांच्या छातीत चाकू खुपसला. गंभीर जखमी झालेल्या नागराज याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

घटनेनंतर मार्केट पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तातडीने आरोपी महिलेला अटक करून सखोल तपास पूर्ण केला आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे जयश्री पवार हिच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने तिला सात वर्षांचा कारावास व २५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.

या खटल्यात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील नारायण आर. आरी यांनी कामकाज पाहिले.

About Belgaum Varta

Check Also

स्वप्न पहा आणि ती स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सचोटीने जिद्दीने वाटचाल करा : लीना भोमाज

Spread the love  बेळगाव : “स्वप्न पहा आणि ती स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सचोटीने जिद्दीने वाटचाल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *