Friday , June 19 2026
Breaking News

पावसाअभावी राकसकोप जलाशय तळाला; शहरावर भीषण पाणीटंचाईचे सावट

Spread the love

 

बेळगाव : मान्सूनने दडी मारल्याने आणि अवकाळी पावसानेही साथ न दिल्याने शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख आधार असलेला राकसकोप जलाशय अक्षरशः तळाला पोहोचला आहे. दिवसेंदिवस झपाट्याने घटणाऱ्या पाणीपातळीमुळे आता मृतसाठ्यातून पाणी उपसा करण्याची वेळ प्रशासनावर आली असून शहरवासीयांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती निर्माण झाली आहे.

राकसकोप जलाशयातील पाणीपातळी सध्या 2448 फूट इतकी असून ती दररोज सुमारे 20 सेंटीमीटरने घटत आहे. येत्या एक-दोन दिवसांत जलाशय पूर्णपणे मृतसाठ्याच्या पातळीवर पोहोचणार असल्याने पाणीपुरवठा मंडळ आणि एल अँड टी कंपनीने रविवारपासून मृतसाठ्यातून पाणी उपसा करण्याची तयारी सुरू केली आहे. ही परिस्थिती शहराच्या जलसुरक्षेसाठी गंभीर इशारा मानली जात आहे.

सध्या शहराला आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र उपलब्ध साठा पावसाळ्यापर्यंत टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाला कठोर पावले उचलावी लागणार आहेत. त्यामुळे आगामी काळात पाणीपुरवठा थेट 15 दिवसांआड करण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

यंदा मृग नक्षत्राला सुरुवात होऊन आठवडाभराहून अधिक कालावधी उलटून गेला तरी मान्सूनचे आगमन झालेले नाही. अवकाळी पावसानेही पाठ फिरवल्याने जलाशयात नव्या पाण्याची आवक थांबली आहे. परिणामी शहराच्या पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत.

उन्हाच्या वाढत्या झळा, घटता पाणीसाठा आणि लांबलेला मान्सून यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याचे नियोजन सुरू असले तरी पावसाने आणखी काही दिवस दडी मारल्यास शहराला अभूतपूर्व पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

दरम्यान, जलाशयातील चिंताजनक परिस्थितीमुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, पाण्याची नासाडी टाळावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. आता शहरवासीयांचे लक्ष आकाशाकडे लागले असून मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा अधिकच उत्कंठावर्धक बनली आहे.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक – महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत बेळगावच्या पाणी संकटावर निर्णायक चर्चा; महाराष्ट्राकडे दोन टीएमसी पाण्याची मागणी

Spread the love  बेळगाव : पावसाने दडी मारल्यामुळे भीषण पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या बेळगाव शहरासाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *