Friday , June 19 2026
Breaking News

कर्नाटक – महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत बेळगावच्या पाणी संकटावर निर्णायक चर्चा; महाराष्ट्राकडे दोन टीएमसी पाण्याची मागणी

Spread the love

 

बेळगाव : पावसाने दडी मारल्यामुळे भीषण पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या बेळगाव शहरासाठी दिलासादायक घडामोड घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात 20 जून रोजी होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीत बेळगावच्या पाणीप्रश्नावर विशेष चर्चा होणार असून, महाराष्ट्राकडून दोन टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मांडला जाणार आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी ही माहिती दिली.

बेळगाव शहर व उपनगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील जलसाठा झपाट्याने घटत असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. समाधानकारक पाऊस न झाल्याने धरणांच्या तळाशी असलेल्या मृत जलसाठ्याकडे प्रशासनाला वळावे लागण्याची वेळ आली आहे. आगामी काही आठवड्यांत परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बेळगावच्या नागरिकांना पाणीटंचाईच्या संकटातून दिलासा मिळावा यासाठी महाराष्ट्राकडून दोन टीएमसी पाणी मिळविण्याचे प्रयत्न सुरू असून, या बैठकीत सकारात्मक निर्णय होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

बेळगावच्या वाढत्या पाणीसंकटामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असताना, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतून ठोस तोडगा निघेल का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ही बैठक निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

लिव्ह-इनमधील प्रेयसीची शिक्षकाकडून निर्घृण हत्या; मृतदेह तिलारी घाटातील जंगलात फेकल्याचा आरोप

Spread the love  बेळगाव : दहा वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीची तिच्याच साथीदाराने दुसऱ्या विवाहाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *