Wednesday , August 19 2026
Breaking News

आद्रा नक्षत्राने दिला दिलासा; पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

Spread the love

 

बेळगाव : पावसाच्या प्रतीक्षेत डोळे लावून बसलेल्या बळीराजाला अखेर आद्रा नक्षत्राने तारले असून मंगळवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाच्या आगमनामुळे रखडलेल्या शेतीकामांना आता वेग येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

यंदा रोहिणी आणि मृग नक्षत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत होते. दोन्ही नक्षत्रांनी हुलकावणी दिल्यामुळे आद्रा नक्षत्रावरच सर्वांची भिस्त अवलंबून होती. अखेर मंगळवारी रिमझिम सरींनी हजेरी लावली आणि कोरड्या पडलेल्या जमिनीला तसेच शेतकऱ्यांच्या आशांना नवे बळ मिळाले.

जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाने दडी मारल्याने अनेक भागांत पिकांना टँकरद्वारे पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. पिण्याच्या पाण्याची टंचाईही जाणवू लागली होती. जलाशयांची पातळी खालावल्याने संभाव्य दुष्काळाची चिंता वाढली होती. विशेषतः भात पिके करपण्याच्या मार्गावर गेल्याने शेतकरी हवालदिल झाले होते.

नक्षत्र बदलल्यानंतर तरी पाऊस पडेल, या आशेवर शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते. त्यानुसार मंगळवारी ढगाळ वातावरणासह पावसाची सुरुवात झाली, तर बुधवारीही रिमझिम सरी कायम राहिल्याने सर्वांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

हवामान खात्याने पुढील सात दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला असून नद्या-नाले तुडुंब भरून वाहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. वळीवाचा पाऊस तसेच रोहिणी आणि मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर सुरू झालेला हा पाऊस शेतकरी, नागरिक आणि प्रशासनासाठी मोठा दिलासा ठरत आहे. त्यामुळे खरीप हंगामातील कामांना गती मिळणार असून बळीराजाच्या चेहऱ्यावर पुन्हा समाधानाचे हास्य फुलले आहे.

About Belgaum Varta

Check Also

गुड्स शेड रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी खासदार जगदीश शेट्टर यांना निवेदन

Spread the love  बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानकाच्या दक्षिण प्रवेशद्वाराला जोडणाऱ्या प्रमुख गुड्स शेड रस्त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *