

बंगळूर : विधान परिषद निवडणुकीत झालेल्या कथित क्रॉस व्होटिंग प्रकरणी कर्नाटक भाजपमध्ये शिस्तभंगाच्या कारवाईचे संकेत मिळाले आहेत. प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी मंगळवारी दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेऊन संबंधित आमदारांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली.
दिल्लीतील भाजप मुख्यालयात झालेल्या बैठकीत विजयेंद्र आणि अशोक यांनी पक्षाच्या काही आमदारांनी अधिकृत सूचनांकडे दुर्लक्ष करून क्रॉस व्होटिंग केल्याची माहिती पुराव्यांसह राष्ट्रीय नेतृत्वास दिली. पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांना माफ करता येणार नाही, असा ठाम आग्रह त्यांनी धरला.
क्रॉस व्होटिंगची चौकशी करण्यासाठी विधान परिषद सदस्य सी.टी. रवी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली ‘सत्यशोधन समिती’ दोन ते तीन दिवसांत अहवाल सादर करणार आहे. हा अहवाल मिळाल्यानंतर संबंधित आमदारांना नोटिसा बजावून त्यांचे स्पष्टीकरण मागवले जाईल. त्यानंतर निलंबन किंवा पक्षातून हकालपट्टीसारखी कठोर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बैठकीदरम्यान विजयेंद्र आणि अशोक यांनी निवडणुकीपूर्वी सर्व आमदारांना मतदानाबाबत स्पष्ट सूचना दिल्या होत्या, मात्र काहींनी पक्षादेशाचे उल्लंघन केल्याचे नमूद केले. अशा प्रकारच्या कृतींवर कठोर संदेश देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षशिस्त सर्वोच्च असल्याचे स्पष्ट करत, समितीचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. पक्षाशी विश्वासघात करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, या बैठकीत केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या अलीकडील वक्तव्यांसह निवडणुकीनंतरच्या राजकीय घडामोडींवरही चर्चा झाली. पक्षातील काही नेते सार्वजनिकरित्या पक्षविरोधी विधाने करत असल्याचा मुद्दाही राष्ट्रीय नेतृत्वासमोर मांडण्यात आला.
सुरेश कुमार आणि सदानंद गौडा यांच्यावरही नाराजी
क्रॉस व्होटिंग प्रकरणातील दोषी शोधण्यासाठी धर्मस्थळ येथे शपथविधी घेण्याच्या निर्णयावर सामाजिक माध्यमांद्वारे नाराजी व्यक्त करणारे आमदार एस. सुरेश कुमार यांच्याबाबतही पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचे सांगितले जाते. पक्षांतर्गत विषय सार्वजनिकपणे मांडण्याऐवजी नेतृत्वाशी थेट संवाद साधायला हवा होता, असे मत वरिष्ठांनी व्यक्त केल्याची माहिती आहे.
तसेच, निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि भाजपमधील काही नेत्यांच्या गुप्त बैठकीमुळे क्रॉस व्होटिंग होणार असल्याची माहिती आधीपासून होती, असे विधान करणारे माजी मुख्यमंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांच्याबाबतही पक्ष नेतृत्वाने नाराजी व्यक्त केली आहे. माहिती असतानाही ती पक्षाच्या निदर्शनास का आणली नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
भविष्यात पक्षाच्या अंतर्गत बाबींवर सार्वजनिकरित्या भाष्य करणाऱ्या कोणत्याही नेत्याविरोधात कारवाई करण्यात येईल, असा इशाराही भाजप नेतृत्वाने दिल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.

Belgaum Varta Belgaum Varta