Wednesday , June 24 2026
Breaking News

मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या मेव्हण्याच्या घरावर ईडीची धाड

Spread the love

 

बेळगाव : सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांचे मेव्हणे तथा बेळगावचे अतिरिक्त अबकारी आयुक्त वाय. मंजुनाथ यांच्या मालमत्तांवर ईडीने बुधवारी सकाळी मोठी कारवाई करत एकाच वेळी सहा ठिकाणी छापे टाकले.
बेळगाव, बंगळुरू, म्हैसूर आणि हासन जिल्ह्यातील आरसीकेरे येथील विविध ठिकाणी ईडीच्या पथकांनी धाडसत्र राबवून कागदपत्रांची तपासणी केली. मंजुनाथ यांच्याशी संबंधित असलेल्या काही निकटवर्तीयांच्या निवासस्थानांवरही शोधमोहीम हाती घेण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, म्हैसूरमधील एका मैत्रिणीचे घर, बंगळुरूतील अपार्टमेंट, आरसीकेरे येथील निकटवर्तीयाचे निवासस्थान तसेच अथणी तालुक्यातील ऐनापूर गावातील एका मित्राच्या घराचीही झडती घेण्यात आली.
माजी खासदार देवेंद्रप्पा यांचे पुत्र असलेल्या वाय. मंजुनाथ यांच्यावर बेनामी व्यवहारांद्वारे जमीन, बार आणि रेस्टॉरंट व्यवसायात गुंतवणूक करून अवैध मालमत्ता जमा केल्याचा आरोप आहे. याच प्रकरणाच्या अनुषंगाने ईडीने ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, ईडी अधिकाऱ्यांनी मंजुनाथ यांचा बंगळुरूतील रेसकोर्स रोडवरील समिट अपार्टमेंटमध्ये शोध घेतला असून ते तेथे आढळून आले आहेत. त्यांच्या निवासस्थानी तसेच इतर ठिकाणी कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
बेळगावातील टीव्ही सेंटर परिसरातील त्यांच्या घरातून काही महत्त्वाची कागदपत्रे हाती लागल्याचे समजते. अवैध आर्थिक व्यवहार आणि मनी लॉन्डरिंगच्या संशयावरून सुरू असलेल्या या तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

बस धावताना दरवाजे बंद ठेवणे बंधनकारक; नियमभंग करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

Spread the love    बेंगळुरू : प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत वायव्य कर्नाटक राज्य परिवहन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *