Thursday , June 25 2026
Breaking News

कंत्राटदाराच्या कथित छळाला बळी पडला तरुण कामगार

Spread the love

 

हिंडाल्कोसमोर ग्रामस्थांचा संताप, प्रशासनाच्या हस्तक्षेपाने तणाव निवळला

बेळगाव : बेळगावजवळील हिंडाल्को कंपनीत कार्यरत असलेल्या अवघ्या २४ वर्षीय शंकर तळवार या तरुण कामगाराने कंत्राटदाराच्या कथित छळाला आणि नोकरी टिकवण्यासाठी करण्यात आलेल्या लाचेच्या मागणीला कंटाळून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आयुष्याच्या उंबरठ्यावर असलेल्या या तरुणाला पाच लाख रुपयांची मागणी पूर्ण करणे अशक्य झाल्याने तो मानसिकदृष्ट्या खचला होता. अखेर आत्महत्येपूर्वी व्हॉट्सॲप स्टेटसवर आपल्या वेदना आणि असहाय्यता व्यक्त करत त्याने गळफास घेऊन जीवन संपवले.

या घटनेची माहिती गावात पसरताच मुत्त्यानट्टी परिसरात संतापाची लाट उसळली. शंकरच्या नातेवाईकांसह शेकडो ग्रामस्थांनी हिंडाल्को कंपनीच्या आवारात धडक देत तीव्र आंदोलन छेडले. संतप्त जमावाने दगडफेक केल्याने काही काळ परिसर रणांगणात परिवर्तित झाला आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले.

परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून शंभरहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. माळमारुती पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि आमदार आसिफ सेठ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पुढाकार घेत कंपनी व्यवस्थापन, ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यात सुमारे एक तास प्रदीर्घ चर्चा घडवून आणली. या चर्चेत मृत शंकरच्या दोन्ही भावांना त्यांच्या आयटीआय पात्रतेनुसार तातडीने कायमस्वरूपी नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कुटुंबाला योग्य आर्थिक नुकसानभरपाई देण्याचेही व्यवस्थापनाने मान्य केले.

आमदार आसिफ सेठ यांनीदेखील आपल्या वैयक्तिक निधीतून मदतीची घोषणा करत कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न केला. याशिवाय स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य देण्याबाबत पुढील पाच दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक घेण्यात येणार असून त्यामध्ये पारदर्शक पद्धतीने चर्चा होणार आहे.

“संबंधित तरुणांच्या हातात नियुक्ती आदेश दिल्याशिवाय आपण कंपनी परिसरातून बाहेर पडणार नाही,” अशी ठाम भूमिका जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी घेतल्याने संतप्त ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आणि अखेर तणावपूर्ण वातावरण निवळले.

मात्र, एका तरुण कामगाराच्या मृत्यूने रोजगार व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचार, कंत्राटी कामगारांचे प्रश्न आणि स्थानिक युवकांच्या हक्कांच्या मुद्द्यांना पुन्हा एकदा ऐरणीवर आणले आहे. शंकर तळवारच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे.

About Belgaum Varta

Check Also

दड्डी सरकारी दवाखान्यात सर्पदंशावरील लस नसल्याने महिलेचा मृत्यू; ग्रामस्थांमध्ये संताप

Spread the love  हुक्केरी : शट्टिहळ्ळी (ता. हुक्केरी) येथील शेतकरी महिला शांता कृष्णा कळविकट्टे यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *