

बेळगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या १९ आणि २० जून २०२६ रोजी झालेल्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान सीमा प्रश्नासंदर्भात निवेदन देण्यासाठी जाणाऱ्या मराठी भाषिक कार्यकर्त्यांना रोखण्यात आल्याच्या घटनेवरून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.
समितीने मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, सीमा भागातील मराठी जनतेच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न सोडविण्याबाबत निवेदन देण्यासाठी १६ जून रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना पूर्वसूचना देण्यात आली होती. मात्र, २० जून रोजी बेळगावहून कोल्हापूरकडे निघालेल्या कार्यकर्त्यांना कर्नाटकातील हत्तरगी येथे पोलिसांनी अडवून बेळगावच्या मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केले.
गेल्या ७० वर्षांपासून मराठी भाषिकांनी आपल्या मागण्यांसाठी सनदशीर मार्गाचा अवलंब केला आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील प्रशासनानेच कर्नाटक पोलिसांना पत्र देऊन मराठी कार्यकर्त्यांना रोखण्याची कारवाई केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून ही कृती निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे.
याच घटनेचा परिणाम म्हणून २२ जून रोजी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चालाही परवानगी नाकारण्यात आल्याचा दावा समितीने केला आहे. मराठी भाषेत शासकीय परिपत्रके उपलब्ध करणे आणि व्यापारी आस्थापनांवर मराठी फलकांना परवानगी देणे या मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. परवानगी नाकारल्यानंतरही हजारो मराठी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येऊन आपल्या मागण्या मांडल्या.
दरम्यान, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या २१ जून रोजी झालेल्या बैठकीत कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध करणारा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
सीमाभागातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात सनदशीर मार्गाने लढा देणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षाही समितीने व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावर मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस माजी महापौर मालोजी अष्टेकर यांच्या सह्या आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta