Saturday , August 22 2026
Breaking News

मराठी अर्ज नसल्याने निवडणूक कर्मचाऱ्यांना धाडले माघारी

Spread the love

 

बेळगाव : बेळगावसह सीमाभागात सध्या निवडणूक विभागाकडून मतदार यादी फेरनिरीक्षण (SIR – Special Intensive Revision) प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याअंतर्गत घरोघरी जाऊन मतदारांना अर्ज दिले जात आहेत. मात्र, प्रशासनाकडून हे अर्ज केवळ ‘कन्नड’ भाषेतच उपलब्ध करून दिले जात असल्याने सीमाभागातील मराठी भाषिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. भाषिक अधिकारांची पायमल्ली होत असल्याने आता मराठी भाषिकांनी याविरोधात आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे.

“​माजी नगरसेवक सुनील बाळेकुंद्री यांचा मराठी बाणा”

​या प्रक्रियेचा भाग म्हणून बेळगावमधील भांदूर गल्ली येथे निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि कर्मचारी अर्ज वाटपासाठी आले होते. त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी नगरसेवक सुनील बाळेकुंद्री यांना कन्नड भाषेतील अर्ज दिला. मात्र, बाळेकुंद्री यांनी आपल्याला कन्नड भाषा अवगत नसून, हे अर्ज मराठीतच उपलब्ध करून द्यावेत अशी ठाम मागणी अधिकाऱ्यांकडे केली.
​यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी “सध्या अर्ज फक्त कन्नडमध्येच उपलब्ध आहेत,” असे उत्तर दिले. त्यावर सुनील बाळेकुंद्री यांनी ते कन्नड अर्ज स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला.

यापूर्वीच्या निवडणूक प्रक्रियांची करून दिली आठवण
​निवडणूक आयोगाने यापूर्वी बेळगावसह सीमाभागात सर्व निवडणूक अर्ज, परिपत्रके आणि इतर प्रक्रिया कन्नडसह मराठीतही राबविली आहेत. भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्कानुसार सन २००८ मध्ये तसा स्पष्ट आदेशच आयोगाने काढला आहे, याची आठवण बाळेकुंद्री यांनी अधिकाऱ्यांना करून दिली. जोपर्यंत मराठीत अर्ज मिळत नाहीत, तोपर्यंत प्रक्रिया पुढे जाऊ देणार नाही अशी भूमिका घेत त्यांनी केवळ कन्नड अर्ज घेऊन आलेल्या अधिकाऱ्यांना माघारी धाडले.

मराठी भाषिकांना आवाहन
​या घटनेनंतर सुनील बाळेकुंद्री यांनी बेळगाव आणि सीमाभागातील समस्त मराठी जनतेला एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. “कुठल्याही मराठी भाषिकाने कन्नडमधील अर्ज स्वीकारू नयेत. त्याऐवजी निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार हक्काने मराठी भाषेतील अर्जांचीच मागणी करावी,” असे ते म्हणाले. सीमाभागात प्रशासनाकडून जाणीवपूर्वक मराठीची गळचेपी करण्याचा प्रयत्न होत असताना, आज समस्त मराठी भाषिकांनी असाच ‘मराठी बाणा’ आणि एकजूट दाखवणे काळाची गरज बनली आहे.

About Belgaum Varta

Check Also

तिलारीचे पाणी राकसकोपमध्ये आणण्याबाबत उद्या महत्त्वपूर्ण बैठक

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहराला तिलारी धरणाचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावर शनिवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *