Wednesday , July 1 2026
Breaking News

मतदार यादीत नाव नसल्यास शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही : मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार

Spread the love

 

राज्यातील मतदार यादी पुनरावलोकन मोहिमेला चालना

बंगळूर : राज्यातील विशेष मतदार यादी पुनरावलोकन (एसआयआर) मोहिमेला मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मंगळवारी आपल्या सदाशिवनगर येथील निवासस्थानी गणना अर्ज भरून प्रारंभ केला. यावेळी त्यांनी, मतदार यादीत नाव नसलेल्या व्यक्तींना हमी योजनांसह इतर शासकीय सुविधांचा लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट केले.

मुख्यमंत्री म्हणाले, “जे राज्याचे मतदारच नाहीत, त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात अर्थ नाही. बिहार, तामिळनाडूसह काही राज्यांत अशी अंमलबजावणी सुरू असून, कर्नाटकमध्येही त्याच धर्तीवर निर्णय घेतला जाईल. त्यामुळे प्रत्येकाने आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून घ्यावी.”

मतदारांनी अर्ज भरताना पूर्वी नोंदवलेला मोबाईल क्रमांक नमूद करावा. क्रमांक बदलला असल्यास तो अधिकाऱ्यांच्या मदतीने अद्ययावत करता येईल. नोंदवलेल्या क्रमांकावर ओटीपी पाठविण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

नाव, छायाचित्र किंवा इतर तपशील दुरुस्त करण्याची सुविधा उपलब्ध असून, कुटुंबातील एका सदस्याने स्वाक्षरी करून संपूर्ण कुटुंबाचा अर्ज भरता येणार आहे. नवीन मतदारांनी निवासाचा पुरावा सादर करावा लागेल, असेही त्यांनी सांगितले.

मोबाईल अ‍ॅप वापरणे अनेकांना अवघड जाते, याबाबत विचारले असता शिवकुमार म्हणाले, “मलादेखील अ‍ॅपची माहिती नव्हती. मी इतरांची मदत घेतली. त्यामुळे नागरिक बीएलओकडून ऑफलाइन अर्ज घेऊनही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.”

दरम्यान, राज्यातील मतदार यादीच्या विशेष सर्वंकष पुनरावलोकन (एसआयआर) मोहिमेला आजपासून सुरुवात झाली असून, ही प्रक्रिया २९ जुलैपर्यंत चालणार आहे. या काळात बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) घराघरांत जाऊन मतदारांची माहिती पडताळणार आहेत.

राज्यातील ५.५४ कोटी मतदारांपैकी ९१.६१ टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून, उर्वरित मतदारांची माहिती या मोहिमेत अद्ययावत केली जाणार आहे. नवीन मतदार नोंदणी, नाव किंवा पत्त्यातील दुरुस्ती यासाठीही अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

महत्त्वाचे वेळापत्रक

३० जून ते २९ जुलै : घरोघर सर्वेक्षण
५ ऑगस्ट : प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर : हरकती व दावे स्वीकारणे
५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर : नोटीस व हरकतींची सुनावणी
७ ऑक्टोबर : अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

मतदारांनी आवश्यक कागदपत्रे बीएलओंना उपलब्ध करून देत सहकार्य करावे आणि मतदार यादीतील आपली माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

शनिवारच्या शाळेच्या वेळेत मोठा बदल; आता सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० पर्यंतच वर्ग

Spread the love  बेळगाव : राज्याच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने शाळांच्या शनिवारच्या वेळापत्रकात महत्त्वाचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *