
बेळगाव : शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, पंधरा-पंधरा दिवसांनी होणारा अपुरा पाणीपुरवठा आणि त्यातही नळातून येणारे दूषित पाणी यामुळे नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. चव्हाट गल्ली परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून पिण्याच्या पाण्यात थेट गटार आणि ड्रेनेजचे पाणी मिसळून येत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, नागरिकांच्या आरोग्याशी अक्षरशः खेळ सुरू असल्याचा संताप व्यक्त होत आहे.
या गंभीर समस्येबाबत स्थानिकांनी संबंधित पाणीपुरवठा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या. दूषित पाण्याचे फोटो, व्हिडिओ आणि प्रत्यक्ष पुरावेही सादर करण्यात आले. मात्र, आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि अधिकाऱ्यांकडून मिळणारी उडवाउडवीची उत्तरे यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ड्रेनेजची मुख्य वाहिनी फुटल्याने सांडपाणी थेट पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनमध्ये मिसळत आहे. त्यामुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला असून, प्रशासन मात्र अद्यापही ढिम्म असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे, याच प्रश्नावर चार महिन्यांपूर्वी स्थानिकांनी आंदोलन छेडले होते. त्यावेळी अधिकाऱ्यांनी दिलेली आश्वासने केवळ कागदावरच राहिली. प्रत्यक्षात परिस्थिती आणखी गंभीर बनली असून, नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास उडाला आहे.
दरम्यान, चव्हाट गल्लीतील भुयारी गटार (यूजीडी) योजनेचे काम अनेक महिन्यांपासून रखडले असून, त्यामागे अंतर्गत कमिशनबाजी आणि भ्रष्टाचार असल्याचा थेट आरोप नागरिकांनी केला आहे. या कामासाठी चार महिन्यांपूर्वीच निधी मंजूर झाला असतानाही काम जाणीवपूर्वक थांबवून ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कंत्राटदार एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यात व्यस्त असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. कंत्राटदार लोकप्रतिनिधींचे नाव पुढे करून काम टाळत आहे, लोकप्रतिनिधी हात झटकत आहेत, तर अधिकारी सर्व काही सुरळीत असल्याचा दावा करत आहेत. या प्रकारामुळे नागरिकांचा संताप आणखी वाढला आहे.
“आता आश्वासने नकोत, काम हवे,” अशी ठाम भूमिका घेत नागरिकांनी संपूर्ण गल्लीत नवीन पाणी पाइपलाइन टाकून प्रत्येक घराला स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे थेट कनेक्शन देण्याची मागणी केली आहे. अन्यथा महिलांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी येत्या शुक्रवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी, संबंधित विभागांचे प्रतिनिधी आणि चव्हाट गल्लीतील नागरिकांचे शिष्टमंडळ उपस्थित राहणार आहे. मात्र, या बैठकीतही केवळ चर्चा न होता दुसऱ्याच दिवसापासून प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही, तर नागरिक थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत तीव्र आंदोलन छेडतील, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta