Sunday , August 23 2026
Breaking News

व्हीटीयूचा देशात नवा विक्रम; परीक्षा संपल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत निकाल जाहीर

Spread the love

 

बेळगाव : विश्वेश्वरय्या तंत्रज्ञान विद्यापीठाने (व्हीटीयू) निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेत देशात नवा आदर्श निर्माण करत अभियांत्रिकीच्या सहाव्या सेमिस्टरचा निकाल परीक्षा संपल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत जाहीर केला आहे. या अभूतपूर्व कामगिरीमुळे ६० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना निकालासाठी प्रतीक्षा करावी लागली नाही. निकाल जाहीर करण्याच्या वेगाबाबत व्हीटीयूने स्वतःचाच विक्रम मोडीत काढत इतिहास रचला आहे.

कुलगुरू डॉ. विद्याशंकर आणि परीक्षा नियंत्रण व मूल्यांकन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत निकालाची घोषणा केली. बी.ई. व बी.टेक. (कॉम्प्युटर सायन्स) सहाव्या सेमिस्टरच्या परीक्षेला ६०,८५६ विद्यार्थी बसले होते. सायंकाळी ५.३० वाजता परीक्षा संपताच ५.३५ वाजता निकाल ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात आला. विशेष म्हणजे, संपूर्ण मूल्यांकन प्रक्रिया नियोजित वेळेपेक्षा २१ दिवस आधी पूर्ण करण्यात आली असून यंदाचा एकूण निकाल ७६.८४ टक्के लागला आहे.

डिजिटल मूल्यांकन प्रणाली, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तांत्रिक सुविधा, अत्याधुनिक संगणकीय प्रणाली आणि विविध विभागांतील प्रभावी समन्वयामुळे हा ऐतिहासिक विक्रम शक्य झाल्याचे कुलगुरू डॉ. विद्याशंकर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना निकालासाठी अनावश्यक प्रतीक्षा करावी लागू नये, हा विद्यापीठाचा प्रमुख उद्देश असून त्यासाठी परीक्षा व्यवस्थापनात सातत्याने तांत्रिक सुधारणा करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यापूर्वीही व्हीटीयूने निकाल जाहीर करण्याच्या बाबतीत अनेक विक्रम नोंदविले आहेत. २०२६ मध्ये अंतिम वर्षाच्या सुमारे ५६ हजार विद्यार्थ्यांचे निकाल दहा मिनिटांत, तर २०२५ मध्ये हजारो विद्यार्थ्यांचे निकाल एका तासात जाहीर करण्यात आले होते. २०२४-२५ शैक्षणिक वर्षात सहाव्या सेमिस्टरच्या ५८,२३२ विद्यार्थ्यांचे निकाल दहा दिवसांत जाहीर करण्यात आले होते. मात्र, यंदा परीक्षा संपल्यानंतर केवळ पाच मिनिटांत निकाल प्रसिद्ध करून व्हीटीयूने देशातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रात नवा मापदंड निर्माण केला आहे.

या ऐतिहासिक कामगिरीसाठी परीक्षा विभागातील अधिकारी-कर्मचारी, मूल्यांकन पथक तसेच संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या समन्वयाचे कुलगुरूंनी विशेष कौतुक केले.

About Belgaum Varta

Check Also

CEIRच्या मदतीने मार्केट पोलिसांनी शोधले १२३ हरवलेले मोबाईल

Spread the love  बेळगाव : नागरिकांचे हरवलेले मोबाईल फोन शोधण्यासाठी केंद्रीय उपकरण ओळख नोंदणी (CEIR) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *