Sunday , September 20 2026
Breaking News

पिरनवाडीतील सोन्याच्या दुकानफोडीचा छडा; गोव्यातील 18 वर्षीय आरोपी अटकेत, 4.78 लाखांचे दागिने जप्त

Spread the love

 

बेळगाव : पिरनवाडी येथील कामाक्षी ज्वेलर्समध्ये झालेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा उलगडा करण्यात बेळगाव ग्रामीण पोलिसांना यश आले असून, गोव्यातील 18 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून ₹4 लाख 78 हजार किंमतीचे 34 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 मे 2026 रोजी शास्त्रीनगर, बेळगाव येथील वृषभ रामचंद्र शिरोडकर यांनी पिरनवाडीतील कामाक्षी ज्वेलर्समध्ये झालेल्या चोरीप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा क्रमांक 113/2026 अन्वये बीएनएस कलम 305(अ) अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला.

पोलीस आयुक्त, उपपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था), उपपोलीस आयुक्त (गुन्हे व वाहतूक) तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त, बेळगाव ग्रामीण उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नागनगौडा कट्टीमनिगौडर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले.

तपासादरम्यान 3 जुलै 2026 रोजी गोवा राज्यातील उत्तर गोवा जिल्ह्यातील साखळी परिसरातील रहिवासी विनायक ऊर्फ चिराग प्रकाश पाटील (वय 18) याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने आपल्या साथीदारांसह पिरनवाडीतील कामाक्षी ज्वेलर्समध्ये चोरी केल्याची कबुली दिली. तसेच बागलकोट जिल्ह्यातील नवनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोन्याच्या दागिन्यांची चोरी आणि मारिहाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निलजीजवळील साखळी चोरी (सराईत चेन स्नॅचिंग) केल्याचीही कबुली दिली.

आरोपीकडून ₹4.78 लाख किमतीचे 34 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

या कारवाईत पोलीस निरीक्षक नागनगौडा कट्टीमनिगौडर, पीएसआय संतोष दळवाई, लक्कप्पा जोडट्टी तसेच कर्मचारी सतीश नायकवाड, श्रीकांत उप्पार, बाळेश पडनाड, आनंद कोटगी, शिवानंद वरचगळ, अमित रूपनवर आणि तांत्रिक विभागातील रमेश अक्की, महादेव काशीद, दीपक दोडगोणी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *