Sunday , September 20 2026
Breaking News

धुवांधार पावसाचा पहिलाच तडाखा! इस्लामिया हायस्कूलची संरक्षण भिंत कोसळली; मोठा अनर्थ थोडक्यात टळला

Spread the love

 

बेळगाव : शहर आणि परिसरात शुक्रवारपासून सुरू झालेल्या धुवांधार पावसाने पहिल्याच झटक्यात प्रशासनाच्या कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. अनेक रस्त्यांवर खड्डे पडू लागले असून ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. अशातच कॅम्प परिसरातील इस्लामिया हायस्कूलची संरक्षण भिंत शनिवारी सकाळी सुमारे ७ वाजता जोरदार आवाज करत कोसळली. सुदैवाने ही घटना शाळा सुरू होण्यापूर्वी घडल्याने मोठी जीवितहानी थोडक्यात टळली.

शुक्रवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भिंतीचा पाया कमकुवत झाल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेली ही संरक्षण भिंत एका क्षणात जमीनदोस्त झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले.

विशेष म्हणजे, काही वेळानंतर शाळा सुरू होणार होती. दररोज सकाळपासून या मैदानावर आणि परिसरात विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. तसेच सेंट मेरीज शाळेकडे जाणाऱ्या विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचीही या मार्गावर सतत ये-जा सुरू असते. ही दुर्घटना अवघ्या काही वेळाने घडली असती, तर गंभीर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता आली नसती.

भिंतीचे मोठे अवशेष रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. सेंट मेरीज शाळेपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. घटनेची माहिती मिळताच कॅन्टोन्मेंट प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पथकाने युद्धपातळीवर ढिगारा हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.

दरम्यान, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अशा घटना घडू लागल्याने शहरातील जुन्या इमारती, संरक्षण भिंती आणि धोकादायक बांधकामांची तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *